लोकेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; अरविंद सोडा अद्यापही पोलिसांच्या हाताबाहेरच
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 15, 2024 07:44 PM2024-02-15T19:44:44+5:302024-02-15T19:45:07+5:30
चिराग लोके याच्या हत्येप्रकरणी नेरुळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नवी मुंबई: चिराग लोके याच्या हत्येप्रकरणी नेरुळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र हल्ल्याचा सूत्रधार अरविंद सोडा व त्याचे इतर साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. नेरुळ येथे घडलेल्या चिराग लोके याच्या हत्येनंतर घटनास्थळावरून पोलिसांनी संशयितांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे अरविंद सोडा व त्यांच्या ७ ते ८ साथीदारांचा पोलिस शोध घेते आहेत. त्यामध्ये सानपाडा येथून एकाला तर मुंब्रा मधून एकाला अटक करण्यात आली आहे. दोघेही सोडाचे साथीदार असून हल्ल्यात त्यांचाही सहभाग होता.
परंतु हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व मोक्का मधील गुन्हेगार अरविंद सोडा याच्याबद्दल अद्याप पोलिसांना माहिती मिळालेली नाही. सोडा व लोके एकमेकांच्या परिचयाचे असून त्यांची जेलमध्ये ओळख झाली होती. दोघांवरही मोक्का लागलेला असून सोडा याच्यावर चेंबूरमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर चिराग लोके देखील मुंबईतच राहणारा असून नेरूळमध्ये त्याची पत्नी व मुले राहतात. दरम्यान २०१३ मध्ये त्याच्यावर नेरूळमध्ये देखील गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्यात त्याला मोक्का लागला होता. तेंव्हापासून तो नेरुळ पोलिसांच्या हजेरीवर होता. तर अरविंद सोडा याचे वडील व मुलगा नेरूळमध्ये रहायला असल्याने त्याचाही नवी मुंबई घरोबा होता.
कालांतराने दोघेही माथाडी कामगार संघटना काढून व्यवसायाच्या माध्यमातून आपापले अस्तित्व निर्माण करू पाहत होते. यासाठी दोघांनीही वेगवेगळे डॉन, राजकीय व्यक्ती यांच्यासोबत घनिष्ट संबंध वाढवण्यास सुरवात केली होती. त्यातच मानखुर्द मधील मॉलमधील माथाडीचे काम आपल्यालाच मिळावे यासाठी दोघांमध्ये चुरस लागली असता, त्यातच सोडा याने लोकेवर हल्ला करून त्याची हत्या केली.