ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 10- एनएमएमटी बसचालक व वाहकाला मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर दोन जण अजूनही फरार आहेत. वाहतुकीत अडथळा झाल्याने बस चालकाने रिक्षा बाजूला करण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. राजू आठवले व दादा नार्डेकर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे व त्यांचा तिसरा साथीदार बस चालक व वाहकाला मारहाण करत होते.
काही वेळाने कारमधून आलेल्या एका व्यक्तीनेदेखील बस चालकांना शिवीगाळ करायला सुरवात केली होती. या प्रकरणाचे व्हिडीओ शूटिंग एक प्रत्यक्षदर्शी व्यक्ती करत होती. ही गोष्ट कारमधून आलेल्या व्यक्तीच्या लक्षात येताच त्याने सदर व्यक्तीलादेखील मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण प्रकरणी अटक केलेले बोगस रिक्षाचालक आहेत.
नवी मुंबई मोठ्या प्रमाणात बोगस रिक्षा चालत असून, त्यामध्ये आरटीओ तसेच पोलिसांचे हितसंबंध गुंतल्याची शक्यता आहे. यामुळे बोगस रिक्षा चालकांवर ठोस कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
दरम्यान झालेल्या प्रकरणाचा तीव्र संताप एनएमएमटी बस कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे. बस व्यवस्थापक यांच्याकडून अनेकदा रिक्षा चालकांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार आरटीओ व वाहतूक पोलिसांकडे करण्यात आलेली आहे. यानंतरही असे प्रकार घडत असल्याने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मारहाणीत जखमी झालेल्या बस कर्मचाऱ्यांनी केली आहे.