लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : गुन्हेगाराची पोलिसांकडे तक्रार केल्याने त्याने संबंधित तरुणाच्या डोक्यात दारूची बाटली फोडून त्याच्या सहकाऱ्यावर देखील बाटलीने हल्ला केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. हल्ल्यातील जखमी तरुण हे परिसरात बसलेले असताना हा प्रकार घडला. हल्लेखोरांची परिसरात दहशत असून त्यांनी आपला दरारा अधिक वाढवण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजते.
रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नेरुळ (शिरवणे सेक्टर १) येथे हि घटना घडली आहे. परिसरात राहणारा तौफिक शेख (२०) हा त्याचे मित्र इम्तियाज राईन व इतर तिघे तिथल्या मैदानात बसले होते. यावेळी त्याठिकाणी मोहम्मद रुमी (२९) हा त्याच्या इतर एका साथीदारांसह दारूच्या नशेत त्याठिकाणी आला. तौफिक याने यापूर्वी मोहम्मद याच्या गुंडगिरीची पोलिसांकडे तक्रार केली होती. याच रागातून मोहम्मद याने रविवारी रात्री तौफिक याच्यावर हल्ला करत हातातली दारूची बाटली डोक्यात मारली. या हल्ल्यात तौफिक जखमी होताच त्याला वाचवण्यासाठी इम्तियाज पुढे आला असता मोहम्मद याने फुटलेल्या दारूच्या बाटलीने त्याच्या गालावर वार केले. त्यामुळे दोघांनीही जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात धाव घेऊन हल्ल्याची तक्रार केली. याप्रकरणी मोहम्मद रुमी व त्याचा सहकारी परवेज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.