पैशांच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये हाणामारी, १० जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:17 AM2017-11-08T02:17:01+5:302017-11-08T02:18:42+5:30
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यातील रकमेच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबांमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार महाड तालुक्यातील शिंदेकोंड येथे घडला
महाड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यातील रकमेच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबांमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार महाड तालुक्यातील शिंदेकोंड येथे घडला. या प्रकरणी दोन्ही भावांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्यानंतर, एमआयडीसी पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिंदेकोंड येथील अनिल बबन शिंदे आणि विजय बबन शिंदे या दोन भावांच्या जमिनीचे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. या पोटी मिळालेल्या मोबदल्याच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.
रविवारी सायंकाळी दोघांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाले आणि वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात काही महिलांचे सोन्याचे दागिने, एक मोबाइल फोन गहाळ झाला असून एका मिनीडोर रिक्षाचीही मोडतोड झाली आहे. या प्रकरणी अनिल शिंदे आणि विजय शिंदे या दोघांनीही परस्परविरोधी तक्र ारी सोमवारी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केल्या.
अनिल शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार विजय बबन शिंदे, रंजना विजय शिंदे आणि पांडुरंग बबन शिंदे यांच्याविरोधात तर विजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अनिल बबन शिंदे, राकेश दत्ताराम शिंदे, शर्मिला अनिल शिंदे, अतिष अनिल शिंदे, अंकिता अनिल शिंदे, सुनंदा दत्ताराम शिंदे, रेश्मा राकेश शिंदे अशा दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.