महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील दोन इमारती अतिधोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 01:55 AM2020-09-07T01:55:43+5:302020-09-07T01:56:09+5:30

इमारतींना तडे गेल्याचे निष्पन्न; महानगरपालिकेने बजावल्या नोटिसा

Two buildings in Panvel of the builder involved in the Mahad accident are extremely dangerous | महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील दोन इमारती अतिधोकादायक

महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील दोन इमारती अतिधोकादायक

googlenewsNext

- वैभव गायकर 

पनवेल : महाडमधील तारिक गार्डन ही इमारत बांधकाम व्यावसायिकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे जमीनदोस्त झाली. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. ही इमारत कोहिनूर डेव्हलपर्सचा मालक फारूक मिया महम्मद काझीने बांधलेली होती. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील काझीने बांधलेल्या चार इमारती असून यापैकी दोन इमारती अतिधोकादायक असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत तत्काळ स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेने दिले असून तसे न केल्यास इमारती खाली करण्याबाबतच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महाड येथील दुर्घटनेतील दोषी बांधकाम व्यावसायिक तळोजा येथील रहिवासी असल्याचे उघड झाल्यानंतर त्वरित पनवेल महानगरपालिका क्षेत्रात त्याने बांधलेल्या बांधकामांची शोधमोहीम हाती घेतली.

आयुक्त देशमुख यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या पथकासह केलेल्या पाहणी दौºयात कोहिनूर डेव्हलपर्सच्या नावाने फारूक काझीने पालिका क्षेत्रातील तळोजा फेज १ या ठिकाणी विकसित केलेल्या तारिक हेरिटेज, तारिक सफायर व तारिक पॅराडाइज अशा तीन प्रकल्पांची पाहणी पालिकेच्या पथकाने केली आहे. यापैकी तारिक हेरिटेज ही इमारत साधारण १२ वर्षांपूर्वी तर इतर २ इमारती ६ वर्षांपूर्वी बांधलेल्या असून तीनही इमारतींना तडे गेल्याचे या पाहणीत निष्पन्न झाले आहे. यापैकी तारिक हेरिटेज या चार माजली इमारतीमध्ये १२ फ्लॅट असून ११ फ्लॅटमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत.

या इमारतीची जरी अंशत: दुरुस्ती सुरू असली तरी ती अत्यंत धोकादायक असल्याचे या पाहणीत समोर आले. तर, तारिक पॅराडाइज या इमारतीत १६ फ्लॅट असून १५ फ्लॅटमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. या इमारतीलादेखील तडे गेले आहेत. तिसºया तारिक सफायर या इमारतीमध्ये १६ फ्लॅट असून १३ फ्लॅटमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत.

तळोजा फेज १ हे क्षेत्र पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट असले तरी नियोजनासाठी सिडकोकडे असल्यामुळे या सर्व इमारतींना बांधकामासाठी व इतर सर्व परवानग्या सिडको प्रशासनामार्फत दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा सविस्तर तपशील सिडको प्रशासनाकडून मागविण्यात आला असून सिडकोने यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पत्राद्वारे सिडको प्रशासनाला दिल्या आहेत.

नव्या इमारतीमध्येही धोकादायक बदल

संबंधित विकासकाचे प्लॉट नंबर १८१ सेक्टर २, तळोजा फेज येथे आणखी एक बांधकाम सुरू आहे. पूर्णत्वाला येत असलेल्या या बहुमजली इमारतीच्या बांधकामांमध्ये रस्त्याच्या बाजूला दुकान गाळे काढण्यात आलेले आहेत. या तीनही दुकान गाळ्यांच्या मधोमध प्रत्येकी एक असे एकूण ३ कॉलम कापून टाकण्यात आले आहेत. यामुळे संबंधित इमारतीच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोहिनूर डेव्हलपर्सने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा फेज १ या ठिकाणी उभारलेल्या इमारतीची पाहणी करताना पालिका आयुक्त सुधाकर देशमुख व इतर अधिकारी.

Web Title: Two buildings in Panvel of the builder involved in the Mahad accident are extremely dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.