नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मधील ए.एस.व्ही केमिकल्स या कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. आग अधिक पसरल्याने शेजारच्या देखील एका कंपनीने पेट घेतला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तास प्रयत्न करावे लागले.
मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. रबाळे एमआयडीसी मधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकल ने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले. त्यामुळे काही मिनिटातच संपूर्ण कंपनीत आग पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. तर सतत होणाऱ्या छोट्या छोट्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून आग वीजवण्याचे प्रयत्न सुरु असतानाच छोटे मोठे स्फोट होत होते. शिवाय आगीचा भडका होऊन शेजारच्या शेखर ऑप्टो इलेकट्रोनिक्स या कंपनीने देखील पेट घेतला होता. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाचे व इतर एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. हि आग वेळीच आटोक्यात न आल्यास परिसरातील इतरही कंपन्यांना धोका होता. त्यामुळे सलग तीन तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने सुमारे तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. परंतु आगीमध्ये दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तर खबरदारी म्हणून परिसरातल्या इतरही कंपन्यांमधील कामगारांना बाहेर काढण्यात आले होते.