नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्याकडून जिरे विकत घेवून तब्बल दोन कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालाडमध्ये राहणारे चेतक पवन जैन यांचा एपीएमसीमध्ये मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार आहे. दोन व्यक्तींनी त्यांच्या गुजरातमधील पुनीत ट्रेडर्स दुकानामधून १६ टन जिरे विकत घेतले. या मालाचे रोख पैसे देवून त्यांनी जैन यांचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांच्याकडून उधारीवर माल खरेदी सुरू केली. आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ च्या दरम्यान दोन कोटी रूपयांचा माल खरेदी केला परंतु प्रत्यक्षात या मालाचे पैसे दिले नाहीत. पाठपुरावा करूनही पैसे परत न मिळाल्याने याविषयी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बाजार समितीमध्ये यापूर्वीही फसवणुकीच्या अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. कांदा मार्केटमध्ये एका खरीददाराने जवळपास ५० लाख रूपयांची फसवणूक केली होती. किरकोळ व्यापारी सुरवातीला रोख रकमेने माल खरेदी करतात. एकदा व्यापाऱ्याचा विश्वास संपादन झाला की या व्यक्ती उधारी ठेवण्यास सुरवात करतात. मालाची रक्कम वाढली की पैसे बुडवून पलायन केले जात आहे. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक
By admin | Published: April 14, 2016 12:19 AM