दोघा मद्यपींचा प्रताप; बेलापूर स्थानकात घुसवली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:39 PM2019-01-12T23:39:35+5:302019-01-12T23:40:03+5:30
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नवी मुंबई : दोघा व्यक्तींनी मद्यधुंद अवस्थेत बेलापूर रेल्वेस्थानकात मोटारसायकल घुसवल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. फलाटावर जाण्यासाठी जिन्यावरही त्यांनी दुचाकी चढवण्याचा प्रयत्न केला असता, ते पडल्याने पुढचा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे बेलापूर स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बेलापूर स्थानकाच्या सेक्टर ११ कडील बाजूने एक मोटारसायकल थेट रेल्वेस्थानकात घुसली. या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित रिक्षाचालकांनीही बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या जोडीने त्यांची मोटारसायकल थेट फलाटावर नेण्याचा प्रयत्न केला, याकरिता स्थानकातील प्रवाशांसाठीच्या भुयारी मार्गातील पायऱ्यांवर त्यांनी धूमस्टाइलने मोटारसायकल चढवण्याचा प्रयत्न केला, यामध्ये तोल जाऊन पडल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला व संभाव्य अनर्थ टळला.
या वेळी काही रेल्वेप्रवाशांनी त्यांना हटकण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याने प्रवाशांनाच अरेरावी करत त्या ठिकाणी पडून राहिले. या घटनेमुळे बेलापूर रेल्वेस्थानकात रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वेस्थानकाबाहेर सुरक्षारक्षक नसल्याने दुचाकीस्वाराने मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल फलाटापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.
भविष्यात अशाच प्रकारातून रेल्वेप्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे पोलिसांसह प्रत्येक स्थानकात नेमलेल्या सुरक्षारक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.