मुंबई : ‘रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्या, पादचाऱ्यांना काही किंमत आहे की नाही? त्या तरूणीने तर हुसेन सय्यद यांच्या टॅक्सीला किड्या मुंगीप्रमाणे चिरडले. हुसेन गेले आणि त्यांची पत्नी उतारवयात निराधार झाली. सय्यद कुटुंबाचेही तेच. त्यांची मुले अजून शिकत आहेत. काय चूक होती दोघांची? ती तरूणी दारूच्या नशेत होती. पेशाने वकील असलेल्या या तरूणीला दारू पिऊन गाडी चालवू नये हा नियम माहित नसावा, त्याच्या परिणाम ठाऊक नसावेत, यावर विश्वास बसत नाही’, हुसेन यांचे पुतणे इक्बाल सय्यद सांगत होते. ‘काकांना एकच मुलगी. लग्नानंतर ती लंडनला राहाते. घरी काका आणि काकी, दोघेच. ती त्यांची स्वत:ची टॅक्सी होती. सकाळी ते ती भाडयाने देत आणि संध्याकाळी किंवा फारतर दहा वाजेपर्यंत एखाद दुसरे भाडे मारून घरी येत. मोहल्ल्यातले एखादे कुटुंब प्रवास करणार असेल तर काळजीने काका स्वत: भाडे मारायचे,’ त्यांनी माहिती दिली.सलीम साबूवाला हे त्यांचे मित्र. सलीम यांना कुठेही जायचे असेल की ते काकांना हाक मारायचे. कालही तेच झाले आणि घात झाला. आता काही दिवसांनी त्यांची मुलगी लंडनला निघून जाईल. मग काकी एकटी पडेल. अपघातात टॅक्सीचेही नुकसान झाले, इक्बाल सांगत होते.ज्या तरूणीने हा अपघात केला तिला कठोर शासन होणे आवश्यक आहे. कारण तिने निष्पापांचे बळी घेतले आहेत, सलीम यांचे भाचे इम्रान सांगत होते. सलीम यांच्या जाण्याने नळबाजारात काल सुतकी माहोल होता. रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पत्नीसह दोन मुली सैफीत गंभीर अवस्थेत आहेत. पत्नीवर काल तर मुलीवर आज शस्त्रक्रिया झाली. मुलगा नोमान थोडक्यात बचावले, इम्रान सांगत होते. तो दहावी पास झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी सलीम सहकुटुंब भिवंडीच्या धाब्यावर गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला.
दोन पेगच्या नशेने दोन कुटुंबे पोरकी
By admin | Published: June 11, 2015 6:01 AM