नवी मुंबई - माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. 11 नगरसेवक नाईकांच्या कार्यालयात अनुपस्थित राहिले असून, माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्धार केला आहे.राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सोमवारी महापौर बंगल्यावर बैठक घेऊन पक्षाचे 52 नगरसेवक व 5 अपक्ष मिळून 57 नगरसेवक भाजपात जाणार असल्याचा दावा केला होता. सर्व नगरसेवक मंगळवारी गणेश नाईक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भाजपात चला, असा आग्रह करणार होते. पण मंगळवारी 11 नगरसेवक कार्यालयाकडे फिरकले नाहीत. माजी उपमहापौर अशोक गावडे व त्यांची मुलगी नगरसेविका सपना गावडे अनुपस्थित होते. गावडे यांच्याशी संपर्क साधला असता मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.कोपरखैरणेमधील नगरसेवक शंकर मोरे हेही बैठकीला गेले नाहीत. मोरे हे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे समर्थक आहेत. अपक्ष नगरसेविका सायली शिंदे याही नाईकांच्या कार्यालयात अनुपस्थित होत्या. कोपरखैरणेमधील नगरसेविका भारती पाटील या शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांच्या बहीण असून, त्या नरेंद्र पाटील यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. तुर्भेमधील दोन नगरसेविका व माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी याच्यासह त्यांचे समर्थक तीन नगरसेवकही बैठकीला नव्हते. सुरेश कुलकर्णी यांच्या आईचे निधन झाल्याने ते आले नाहीत. त्यांचा गट गणेश नाईक यांच्या सोबत राहील, असा विश्वास नाईक समर्थकांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये दोन गट, 11 नगरसेवकांची अनुपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 2:39 PM