नवी मुंबईतील दोघांची निवडणुकीत बाजी; मिरजसह जुन्नरमध्ये विजय, चौघांना अपयश
By नामदेव मोरे | Published: December 2, 2024 06:38 AM2024-12-02T06:38:18+5:302024-12-02T06:38:44+5:30
पराभव झालले शशिकांत शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.
नामदेव मोरे
नवी मुंबई : कर्मभूमी नवी मुंबई असलेल्या सहा उमेदवारांनी राज्याच्या विविध भागांत विधानसभेची निवडणूक लढविली होती. यापैकी सुरेश खाडे आणि शरद सोनावणे या दोघांना यश आले असून, चारजणांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभव झालले शशिकांत शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.
राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक नागरिक नोकरी व्यवसायासाठी नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत. यापैकी अनेक जण येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यकरत असून, आपल्या जन्मभूमीमध्येही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जन्मभूमीमधील ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेपर्यंत विविध निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील चाकरमान्यांची भूमिका महत्त्वाची असते.
या वर्षीच्या निवडणुकीमध्ये येथील सहाजण राज्याच्या विविध भागांतून निवडणूक लढवत होते. यापैकी सांगली जिल्ह्यातील मिरजमधून सुरेश खाडे यांनी ४५ हजार १९५ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. यावेळेस त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चुरशीची लढत
जुन्नर मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढविणारे शरद सोनावणे यांनीही विजय मिळविला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. सोनावणे हे बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील व्यापारी आहेत. बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघातून पराभवास सामोरे जावे लागले आहे. उदगीरमधून निवडणूक लढणारे सुधाकर भालेराव, राजापूरमधून अविनाश लाड, वाशीममधून संजू वाडे यांनाही अपयश आले आहे.
मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?
ऐरोली मतदारसंघातील गणेश नाईक यांनी सहा वेळा निवडणूक जिंकली. तीन वेळेस मंत्रिपद मिळविले. मंदा म्हात्रे बेलापूरमधून सलग तीन वेळा जिंकल्या आहेत. तसेच नवी मुंबईतील दोन उमेदवार विजयी झाले. यात तीनजण भाजपचे असून, त्यांच्यापैकी मंत्रिपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.