सोनसाखळी चोरणाऱ्या दोघा सराईतांना अटक, १७ गुन्ह्यांची उकल
By सूर्यकांत वाघमारे | Published: June 15, 2023 06:30 PM2023-06-15T18:30:13+5:302023-06-15T18:30:28+5:30
चोरीच्या मोटारसायकलवरून करायचे गुन्हे .
नवी मुंबई : सोनसाखळी चोरी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार फरार असून पोलिस त्यांचाही शोध घेते आहेत. या दोघांकडून १७ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
शहरात घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुशंघाने गुन्हे शाखा पोलिसांकडून तपास सुरु होता. यासाठी गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सहायक निरीक्षक संदीप गायकवाड, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभव रोंगे, हवालदार तुकाराम सूर्यवंशी, दीपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पवार आदींचे पथक केले होते. त्यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून काही संशयितांची माहिती मिळवली होती. यासाठी पथकाने नवी मुंबईसह ठाणे, मुंबई परिसरात देखील झडती घेतली. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोघांची माहिती मिळताच सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद सादक जाफरी (२१) व कैलास कमलबहादूर नेपाळी (२४) अशी त्यांची नावे आहेत. जाफरी याचा कळंबोली येथील एका गुन्ह्यात सहभाग दिसून आला असून त्याच्याकडून ६ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये सहभागी असलेल्या त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे रबाळे येथील एका गुन्ह्यात नेपाळीचा सहभाग दिसून आला असून त्याच्याकडून ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नेपाळी हा नेरळला (कर्जत) राहनारा असून जाफरी हा मुंब्राचा आहे. चोरीच्या मोटरसायकल वापरून ते नवी मुंबईसह लगतच्या परिसरात सोनसाखळी चोरी करत होते. यामुळे ते सहजरित्या पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यांच्या साथीदारांना देखील अटक झाल्यास सोनसाखळी चोरीचे इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यानुसार याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिस अधीक तपास करत आहेत.