परमशांतीधाम वृद्धाश्रमातील दोघांचा मृत्यू, १६ जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:33 AM2021-04-21T00:33:23+5:302021-04-21T00:33:29+5:30
पालिकेकडून इतर आश्रमांची चाचपणी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल मधील तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या परमशांतीधाम वृद्धाश्रमातील ५६ वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ६१ पैकी ५६ जण कोरोनाने बाधित झाले असून यापैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
बाधितांपैकी १६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. १६ वृद्ध नागरिक कामोठे एमजीएम याठिकाणी उपचार घेत आहेत. यापैकी वृद्ध हे ६० ते ८० वयोगटातील आहेत. तर ४० जणांना आश्रमातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
पालिकेचे आरोग्य विभागाचे पथक या वृद्धांची तपासणी करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. बहुतांश वृद्धांचे कुणीही नातेवाईक नसल्याने वृद्धाश्रम प्रशासन व पालिका प्रशासन मार्फत या वृद्धांचे पुढे उपचार करावे लागणार आहे. शनिवारी या वृद्धांची अँटीजन चाचणी करण्यात आली होती. त्यांनतर बहुतांशी वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती येथील व्यवस्थापक अभय वाघ यांनी दिली. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात येथील वृद्धांचे अतिशय सुरक्षित पद्धतीने देखरेख करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात आश्रमात अतिशय वेगाने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहावयास मिळाले. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी येथील आश्रमाची जबाबदारी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्वीकारली असून येथील विलगीकरण केलेल्या वृद्धांची पालिकेचे आरोग्य पथक नियमित तपासणी करीत असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास त्वरित येथील वृद्धांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल अशी माहिती ही त्यांनी दिली.
आमदार बाळाराम पाटील पालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर पालिका प्रशासनाने त्वरित वृद्धांना आरोग्य सेवा उपलब्ध होईल याकरिता प्रयत्न सुरु केले.