दोन लाख २५ हजार अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:05 AM2018-09-17T05:05:09+5:302018-09-17T05:05:23+5:30
सिडकोच्या १४८३८ घरांसाठी तब्बल दोन लाख २५ हजार अर्ज दाखल झाले आहेत.
नवी मुंबई : सिडकोच्या १४८३८ घरांसाठी तब्बल दोन लाख २५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी एक लाख ७१ हजार अर्जदारांनी शुल्काचा भरणा केला आहे, तर उर्वरितांना शुल्क भरण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटासाठी १४८३८ घरांचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत तब्बल दोन लाख २५ हजार ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी सुमारे पावणेदोन लाख अर्जदारांनी शुल्काचा भरणा करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. शुल्क भरण्यासाठी सोमवारी संध्याकाळपर्यंतची वेळ असल्याने प्रत्यक्ष अर्जदारांचा आकडा दोन लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज सिडकोच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सिडकोने पुढील वर्षभरात विविध घटकांसाठी ५५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी २५ हजार घरांची घोषणा डिसेंबरमध्ये केली जाणार आहे. उर्वरित ४० हजार घरांचा आराखडाही तयार केला आहे.