नवी मुंबईत दोन लाखांचा टप्पा पूर्ण : ८१ टक्के चाचण्या निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 11:55 PM2020-10-02T23:55:44+5:302020-10-02T23:56:11+5:30
नवी मुंबईत दोन लाखांचा टप्पा पूर्ण : कोरोना चाचण्यांविषयी संभ्रम न ठेवण्याचे आवाहन
नामदेव मोरे।
नवी मुंबई : कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत दोन लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. एकूण चाचण्यांपैकी फक्त १८.४० टक्के चाचण्याच पॉझिटिव्ह आल्या असून, तब्बल ८१.६० टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व लक्षणे असलेल्या प्रत्येकाने विनाविलंब चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी खंडित करण्यावर महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. वेळेत रुग्ण शोधून त्याचे विलगीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. प्रतिदिन २ ते ३ हजार चाचण्या केल्या जात आहेत. २२ ठिकाणी अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय सहा पथकांच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात असून, तेथेही अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्हच येतो, असा समजही पसरवला जात असून, जास्त लक्षणे असल्याशिवाय चाचण्या करू नये, असे मॅसेजही पसरविले जात आहेत, परंतु प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. शहरातील एकूण चाचण्यांपैकी तब्बल ८१.६० टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फक्त १८.४० टक्के अहवालच पॉझिटिव्ह आले आहेत.
ज्यांनी वेळेत चाचणी करून उपचार सुरू केले, ते लवकर कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यांनी चाचण्या करण्यास विलंब केला, त्यांना आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्स व आयसीयू बेडची आवश्यकता भासत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ज्या नागरिकांना थोडीही लक्षणे आहेत, त्यांनी तत्काळ चाचणी करून घ्यावी. जे रुग्णाच्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही तत्काळ चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
आयुक्तांनी दिली गती : महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी १४ जुलैला आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी शहरात फक्त २६,७३१ नागरिकांची कोरोना चाचणी झाली होती. कोरोनाचे अहवाल येण्यास ५ ते १० दिवसांचा कालावधी लागत होता. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ अँटिजेन चाचण्या सुरू केल्या. आरटीपीसीआर लॅबही सुरू केली. यानंतर, पुढील अडीच महिन्यांत तब्बल १ लाख ७५ हजार चाचण्या पूर्ण केल्या आहेत, याशिवाय अहवाल येण्यासाठी येणारा विलंबही पूर्णपणे थांबला आहे.
शहरातील महिनानिहाय चाचण्यांचा तपशील
कालावधी चाचण्या
मार्च/ एप्रिल ३१७५
मे ८५७४
जून ९१२२
जुलै २९५४७
आॅगस्ट ७९०३०
सप्टेंबर ६८३५७
नवी मुंबई महानगरपालिकेने अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. ज्या नागरिकांना लक्षणे आहेत व जे रुग्णाच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी विनाविलंब चाचण्या करून घेणे आवश्यक आहे.
- अभिजीत बांगर,
आयुक्त महानगरपालिका