भिवंडी : दाभाड ग्रामपंचायतमधील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने दोन मुख्य ठेकेदारांना ठाणे कोर्टातून अटक केली आहे. त्यामुळे तालुक्यातील पेयजल योजनेतील मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. या कोट्यवधी रूपयांच्या योजनेकरीता ई-टेंडरव्दारे निविदा न मागविता जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता, उप अभियंता व ठेकेदार यांनी संगनमताने वर्क आॅर्डरव्दारे ही योजना दाभाड ग्रामपंचायत राबविली. त्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. तसेच माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीव्दारे ठेकेदाराचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप लापखुर्दमधील समाजसेवक राजाराम पाटील यांनी केला आणि जिल्हा परिषदेकडे लेखी पत्राव्दारे फौजदारी कारवाईची मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सहाय्यक अभियंता उत्तम आंधळे यांनी पडघा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला. मात्र पडघा पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे हा तपास ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. तपासांती दाभाड ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष किशोर विठ्ठल पाटील व सचीव मनीषा रमेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. मात्र तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक घाग यांनी मुख्य ठेकेदारांना पकडण्यासाठी विशेष मेहनत घेतली नाही, असा आरोप तक्रारदार करीत होते. दरम्यानच्या चार महिन्यात आरोपींनी उच्च न्यायालयांत व सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला. मात्र त्या न्यायालयांनी तो फेटाळून लावत त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर रहाण्यास सांगितले. अखेर गुन्ह्यातील आरोपी तथा बोगस ठेकेदार नीलेश दुंदाराम पाटील व राहुल रघुनाथ पाटील हे ठाण्याच्या मुख्य न्यायाधीशांसमोर हजर झाले. ठाणे न्यायालयाच्या प्रशासनाने पोलीसांना लेखी पत्राने कळविल्यानंतर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक महेश शेटे यांनी दोन्ही आरोपींचा ताबा घेतला. दोघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एकंदरीत गुन्ह्याचे स्वरूप पाहाता गुन्हेगारांची पोलीस कोठडी वाढवून मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दोन मुख्य बोगस ठेकेदारांना अटक
By admin | Published: November 17, 2016 5:07 AM