दोन महिन्यांत शहरातील ३०० पशू-पक्ष्यांना उष्माघात
By admin | Published: April 10, 2017 06:22 AM2017-04-10T06:22:39+5:302017-04-10T06:22:39+5:30
दिवसेंदिवस शहरातील तापमानाचा पारा वाढत असून, या उष्म्याचा त्रास मुक्या जनावरांनाही होत आहे
प्राची सोनवणे / नवी मुंबई
दिवसेंदिवस शहरातील तापमानाचा पारा वाढत असून, या उष्म्याचा त्रास मुक्या जनावरांनाही होत आहे. हिटस्ट्रोक, उलटी, जुलाबाने त्रस्त पशू-पक्ष्यांवर उपचारासाठी शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात रांगा लागल्या आहेत. कावळे, कबुतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांवर वाढत्या उष्णतेचा दुष्परिणाम होत असून, नागरिकांनी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन प्राणिप्रेमी संस्थांनी केले आहे. गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताने त्रस्त शहरातील ३०० पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी ३० हून अधिक मुक्या जीवांना प्राण गमवावे लागले आहे.
प्रखर सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी पशू-पक्षी आसरा शोधत सावलीत बसतात. मात्र, हा उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने हवेतील उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते. तसेच दम लागतो, हिटस्ट्रोक होतो आणि भोवळ येऊन ते पडतात. अशा वेळी काही पक्षी गंभीर जखमी होतात आणि काहींना प्राण गमवावे लागत असल्याची माहिती भूमी जीवदया संवर्धन ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे प्रमुख सागर सावला यांनी सांगितले. ४० अंशापर्यंत पोहोचलेला पारा, वातावरणातील असह्य उष्णतेमुळे गेल्या दोन महिन्यांत नवी मुंबई परिसरातील ३०० पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यात आल्याची माहिती सावला यांनी दिली. तुर्भे सेक्टर २३ येथील जनता मार्केट परिसरातील रुग्णालयात या पशू-पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत. घार, घुबड, कोकीळ, पोपट, चिमणी आदी पक्षी डिहायड्रेशन, हिटस्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल झाल्याचेही सावला यांनी सांगितले. जुलाब, उलटीमुळे त्रासलेले, तसेच त्वचारोग झालेले कुत्रे, मांजरीही रुग्णालयात दाखल झाले आहेत.
शहरातील हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आसरा शोधावा लागत आहे. पशू-पक्ष्यांसाठी असलेली पाणी पिण्याची ठिकाणेही कमी होत चालल्याने त्यांना पाण्याच्या शोधात लांबवर जावे लागते. उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने घरोघरी एसी, कुलर लावून घेतले आहे. एसीच्या थंड हवेचा घरातील पाळीव प्राण्यांना त्रास होतो. अनेक जण प्राण्यांना स्वत:च उपचार देतात. यामुळे प्राण्यांचा आजार पूर्णपणे बरा होईल, अशी शाश्वती देता येत नसल्याची माहिती पशुवैद्यकांनी दिली.
काळजी
कशी घ्यावी?
प्राण्यांचे जेवण नेहमी ताजे असावे. ग्लुकोज, मल्टिव्हिटॅमिन सिरप पिण्यास द्यावे.
खिडकीवर, बाल्कनीत छोटेखानी भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी काढून ठेवावे. दोन-तीन तासांनंतर हे पाणी बदलावे.
घरच्या घरी उपचार देण्याऐवजी पशुवैद्यकांचा सल्ला नेहमी घ्यावा.
मांसाहार प्राण्यांचे आवडते खाद्य असले तरी उन्हाळ्यात हे पदार्थ त्यांना सारखे देऊ नयेत. उन्हात हे पदार्थ लगेच खराबही होतात. त्यामुळे प्राण्यांना जुलाब, उलटीसारखे आजार होतात.
उन्हाळ्यात प्राण्यांना दूध, दह्यासोबत शाकाहारी पदार्थ द्यावेत.