पनवेल : बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्तचंदनाची दुबईला तस्करी करण्याची तयारी करणाऱ्या आणखी दोघा आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. भारत नारायण पाटील (बोकडवीरा) आणि राजेश वसंत जगताप (उरण) अशी या आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात अटक केलेल्यांची संख्या १२ झाली आहे.फेब्रुवारी २०१५ मध्ये तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कल्हे येथील सिद्धांत हॉटेलसमोर तालुका पोलिसांना बेवारस स्थितीत ट्रेलरसह सील नसलेला कंटेनर आढळला होता. पोलिसांनी या बेवारस कंटेनरची तपासणी केली असता त्यात रक्तचंदनाचे आठ ओंडके सापडले. पोलिसांनी ट्रेलरसह कंटेनर व रक्तचंदन जप्त करून गुन्हा दाखल केला व तपासाला सुरु वात केली. ट्रेलरचालकाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यानंतर गाडी विकत घेणारा प्रशांत भिलारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याने इतर आरोपींच्या मदतीने रक्तचंदनाचे ओंडके बनावट कागदपत्रे बनवून दुबई येथे पाठविणार होतो, असे पोलिसांना सांगितले.रहेमान भाई याने पुणे-सातारा रस्त्यावरील वेळे फाटा येथून हे रक्तचंदन आणले असल्याचे भिलारे याने सांगितले. कंटेनर क्र . एमएच ०४ बीयू ६६४९ चालक रामजन कौल या चालकाला रक्तचंदन विषयी काहीही सांगितले नाही. त्यानंतर चालकाला आरोपींनी त्यांच्या चारचाकी गाडीत बसवून खांदा कॉलनीत आणून सोडून दिले व कंटेनर पळवून नेला.कंटेनरमध्ये २१६ किलो वजनाचे एकूण ८ ओंडके आढळले त्यांची किम्मत २१ लाख ६० हजार रु पये असून यासह २० लाख रुपये किमतीचा कंटेनरही चोरट्यांनी पळविला होता. त्यानंतर आरोपींनी दोन कंटेनरचे बॉक्स तयार केले. त्यातील एका बॉक्समध्ये ओरिजनल मेझ स्टार्च पावडर असलेला माल त्यांनी भरला. तो माल कस्टम क्लीयरन्स झाल्यांनतर त्याच क्रमांकाच्या बनावट कंटेनरमध्ये रक्तचंदनाचा कंटेनर भरून जेएनिपटी बंदरातून दुबई येथे पाठविण्याची तयारी केली होती.>अटक केलेले आरोपीहा माल दुबई येथे पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपी प्रशांत बबन भिलारे (खारघर), किशोर जगन्नाथ यादव (सातारा), अशोक बाबुराव शेरेकर (सातारा), किशोर गणपत बिरामणे (सातारा), उमेश अशोक सिंग (कलिना), सुमित शिवकुमार वाणी (उरण), संतोष राम पाटील (चिर्ले), दीपक नामदेव पाटील (चिर्ले), बाळा बाबुराव जाधव (खांदा कॉलनी), पांडुरंग तुकाराम बाबरे (खांदा कॉलनी), मिथुन उर्फ बंटी रघुनाथ पाटील (चिरनेर), नीतेश सदाशिव पाटील (धुतूम) यांना २०१५-१६ मध्ये अटक केली होती, यातील दोन आरोपी फरार होते. त्यांना नोव्हेंबर २०१८ मध्ये अटक करण्यात आली.>यांनी केली कारवाईगुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस हवालदार विष्णू डुबल, पोलीस नाईक गोरख सरोदे, राकेश मोकल, अमोल कांबळे, पोलीस शिपाई संतोष पाटील, जगदीश भाट यांच्या पथकाने फरार असलेल्या भारत नारायण पाटील (बोकडवीरा) आणि राजेश वसंत जगताप (उरण) दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली.
चंदनचोरीप्रकरणी आणखी दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 11:35 PM