फरफट थांबणार; बेलापूर-पेंधर मार्गावर आणखी दोन मेट्रो स्टेशन

By कमलाकर कांबळे | Published: December 12, 2023 08:31 PM2023-12-12T20:31:54+5:302023-12-12T20:32:21+5:30

उद्योजकांच्या मागणीला सिडकोचा सकारात्मक प्रतिसाद.

Two more metro stations on Belapur Pendhar route | फरफट थांबणार; बेलापूर-पेंधर मार्गावर आणखी दोन मेट्रो स्टेशन

फरफट थांबणार; बेलापूर-पेंधर मार्गावर आणखी दोन मेट्रो स्टेशन

नवी मुंबई : बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यामुळे पेंधरपासून पुढे तळोजा एमआयडीसी क्षेत्रात आणखी दोन मेट्रो स्थानकांची निर्मिती करावी, अशी मागणी येथील उद्योजकांनी सिडकोकडे केली आहे. विशेष म्हणजे सिडकोने यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने तळोजा औद्योगिक क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांची परवड थांबणार आहे.

मागील अकरा वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचा बेलापूर ते पेंधर दरम्यानचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. गेल्या महिन्यात या मार्गावर प्रवासी सेवाही सुरू करण्यात आली आहे. पेंधर स्थानक तळोजा नोडमध्ये येते. त्यामुळे या मार्गाचा तळोजा एमआयडीसीतील उद्योजक आणि कर्मचाऱ्यांना काहीच फायदा होत नाही. विशेष म्हणजे येथील औद्योगिक क्षेत्रात नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधून लाखो कर्मचारी काम करायला येतात. त्यांची सर्व मदार रस्ते वाहतुकीवर आहे. 

एनएमएमटीच्या बसेस वगळता अन्य कोणतेही वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान मेट्रोची अकरा स्थानके आहेत. या मार्गावरील पेंधर हे अकरावे स्थानक आहे. त्यात स्थानक क्रमांक १२ आणि १३ अशा दोन स्थानकांची भर घालून हा मार्ग तळोजा एमआयडीसी क्षेत्रात विस्तारित करावा, अशी मागणी तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनने सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या एका शिष्टमंडळाने अलीकडेच सिडकोच्या संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन सिडकोने दिल्याचे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Two more metro stations on Belapur Pendhar route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.