नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिवालीशियस मिसेस २०२१ स्पर्धेसाठी देशातून पाच महिलांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईमधील दीपिका रावल व सौम्या सिंग या दोन महिलांचा समावेश आहे. या स्पर्धेत २० पेक्षा जास्त देशांतील महिलांनी सहभाग घेतला आहे.
कोरोनामुळे मिसेस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. ८ महिने सोशल मीडिया व वेबसाइटवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया राबविण्यात आली. या स्पर्धेमध्ये सिंगापूर, ब्राझील, उझबेकिस्तान, भारत, फिलिपीन्ससह २० देशांतील महिला सहभागी झाल्या आहेत. नोंदणी प्रक्रियेनंतर भारतामधील विविध विभागांतील ५ स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी नवी मुंबईतील दीपिका रावल यांना ब्रँड ॲम्बेसिडर मिसेस प्लस युनिव्हर्स व सौम्या सिंग यांची अर्थ युनिव्हर्स (यू.पी.) म्हणून निवड झाली आहे. या दोन्ही महिला या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मिसेस युनिव्हर्स स्पर्धेची अंतिम स्पर्धा नोव्हेंबरमध्ये भारतामध्ये होणार असून, याची उत्सुकता सर्वांना आहे.