महापालिकेला दोन नवीन पुरस्कार
By admin | Published: May 6, 2017 06:29 AM2017-05-06T06:29:57+5:302017-05-06T06:29:57+5:30
स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे. राज्यात सर्वाधिक कर वसुली व कचरा वर्गीकरणामध्ये उत्तम कामगिरी केल्याप्रकरणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी पत्रकार परिषद घेवून पालिकेला केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिलेल्या दोन पुरस्कारांविषयी माहिती दिली. केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला देशात ८ वा व पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळाला. पहिल्या दहा शहरांमध्ये राज्यातील एकमेव शहर आहे. केंद्र शासनाबरोबर राज्य शासनानेही नवी मुंबईचा सन्मान केला आहे. महापालिकेने घनकचरा वर्गीकरणामध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेवून विशेष सन्मान केला आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ चे काटेकोर पालन पालिकेने केले आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात आहे. प्रत्येक सोसायटीला सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचे व ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचे मोठे डबे वितरित केले आहेत. सद्यस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातून १६५ ते १७५ मेट्रिक टन ओला कचरा व ८० ते ९० मेट्रिक टन सुका कचरा संकलित केला जात आहे. याशिवाय हरित कचऱ्याचे सरासरी प्रमाण ५० मेट्रिक टन एवढे आहे. याशिवाय पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालून २८२ ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून १५ लाख ५६ हजार इतकी दंड वसुली व प्लास्टीक जप्त करण्यात आले असून याची दखल घेवून राज्य शासनाने पालिकेचा गौरव केला आहे.
महापालिकेने महसूल संकलनामध्येही राज्यात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक संस्था बंद केल्यानंतरही महापालिकेने २०१५ - १६ मध्ये तब्बल ८७० कोटी कर वसुली केली होती. २०१६ - १७ या आर्थिक वर्षामध्ये एलबीटीच्या माध्यमातून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख रूपये वसुली केली आहे. यापूर्वीच्या थकबाकीदारांकडून ७० कोटी रूपये वसूल करण्यात यश मिळविले आहे. मालमत्ता कर विभागानेही गतवर्षीच्या ५०७ कोटीमध्ये १४० कोटीची भर टाकून तब्बल ६४७ कोटी रूपये कर वसूल केला आहे. या कामगिरीची दखल घेवून शासनाने प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या वेळी सभागृहनेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. स्वच्छतेमध्ये देशात ८ वा क्रमांक मिळाला असून भविष्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
- सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई
स्वच्छ भारत अभियानामध्ये मिळालेले यश लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांचे आहे. सर्वांनी संघटितपणे काम केल्यामुळे महापालिकेला देशपातळीवर नावलौकिक मिळाला. राज्य शासनानेही दोन पुरस्कार दिले आहेत. भविष्यात अधिक चांगले काम केले जाईल.
- रामास्वामी एन.,
आयुक्त, नवी मुंबई