नवी मुंबई : उरण फाटा येथील अपघातप्रकरणी नेरुळ पोलिसांनी सायन-पनवेल टोलवेज कंपनीच्या दोघांना अटक केली आहे. अपघातानंतर कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. अखेर सोमवारी दोघे जण बंगळुरूला जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली.रमजान पटेल व संजित श्रीवास्तव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे जण मुंबई विमानतळावर आले असता नेरुळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दोघेही सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे पदाधिकारी आहेत. सायन- पनवेल मार्गावर उरण फाटा येथील पुलावर चुकीच्या पध्दतीने मास्टीक अस्फाल्ट डांबरीकरणामुळे रस्ता गुळगुळीत होऊन अपघात घडत होते. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी अनेकदा सायन-पनवेल टोलवेज कंपनीला (एसपीटीपीएल) अनेकदा त्रुटीमध्ये सुधार करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतरही टोलवेज कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ४ जुलै रोजी उरण फाटा येथील पुलावर भीषण अपघात घडला होता. एकापाठोपाठ अनेक वाहने घसरून घडलेल्या अपघातामध्ये एकाचा जीव गेला होता. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात टोलवेज कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात टोलवेज कंपनीचे उपाध्यक्ष पवनितसिंग सेठी, सहायक उपाध्यक्ष विभूदत्ता सतपती, प्रोजेक्ट हेड रमजान पटेल, मेंटेनन्स मॅनेजर संजित श्रीवास्तव व किशोरकुमार साहू यांचा नवी मुंबई पोलिसांकडून शोध सुरू होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर ते सर्व जण भूमिगत झाल्यामुळे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. मात्र ते राज्य अथवा देशाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ पोलीस त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. यानुसार मंगळवारी दोघे जण मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या पथकाने विमानतळावर सापळा रचला होता. यावेळी रमजान पटेल व संजित श्रीवास्तव यांना अटक करण्यात आली. दोघेही विमानाने बंगळुरूला जाण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी त्यांची माहिती मिळताच सापळा रचून अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले.
टोलवेज कंपनीच्या दोघांना अटक, उरण फाटा अपघात प्रकरण; परराज्यांत पळून जाताना कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:53 AM