अपघाताचा बनाव करून लुटणारी दुकली अटकेत
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 31, 2023 03:39 PM2023-03-31T15:39:07+5:302023-03-31T15:40:37+5:30
दोघांचा शोध सुरु: चालकांना धमकावून लुटायचे पैसे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भरधाव वाहनांना स्वतःहून कट मारून अपघातामध्ये बचावल्याचा बनाव करून चालकांना लुटणाऱ्या दोघांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही कोपर खैरणेचे राहणारे असून त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांनी शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारे अनेकांना लुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे बेलापूर मार्गावर दिघा येथे एका मोटारसायकलस्वाराला लुटल्याची घटना घडली होती. अज्ञात दोघांनी त्याच्या मोटरसायकलला कट मारून अडवले होते. यांनतर त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्या मोबाईलमधील फोन पे मधून २० हजार रुपये एका खात्यात पाठवण्यात आले होते. यासंदर्भात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठ निरीक्षक सुधी पाटील यांनी उपनिरीक्षक दीपक शेळके यांचे पथक केले होते. या पथकाने सदर बँक खातेधारक व त्याच्या सहकाऱ्यांची माहिती मिळवली असता लुटमारी करणाऱ्या टोळीची माहिती हाती लागली. त्याद्वारे सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख खान (२२) व अश्रफ खान (२२) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कोपर खैरणे सेक्टर १९ मध्ये राहणारे आहेत. तर अण्णा पुजारी व विनय धनके या त्यांच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
हे सर्वजण मोटारसायकलवरून शहरात फिरत असताना एखाद्याला जाणीवपूर्वक कट मारायचे. त्यानंतर सदर चालकासोबत वाद घालून त्यांच्याकडून रोकड अथवा ऑनलाईन पैसे खात्यात घ्यायचे. अशाप्रकारे त्यांनी केलेले दोन गुन्हे समोर आले असून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी एपीएमसी पोलिसांनी अशाच प्रकारे चालकांना लुटणाऱ्या बंटी बबलीला अटक केली होती. त्यानंतर दुसरी टोळी समोर आल्याने शहरात अपघाताचा बनाव करून लुटमाऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"