नवी मुंबई : भरधाव वेगाने जाणाऱ्या संशयास्पद वाहनाला अडवून त्यांच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना वाहनातील टोळक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी त्या वाहनातील अज्ञात टोळक्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनातील सात ते आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे वाशी सेक्टर - ११ मध्ये घडली. या मारहाणीनंतरच सर्व मारेकरी पळून गेले असून वाशी पोलिसांनी या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, टोळक्यांच्या मारहाणीत पोलीस नाईक किशोर पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या मारहाणीत वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जखमी पोलीस नाईक किशोर पवार हे आपल्या अन्य एका सहकाऱ्याबरोबर मध्यरात्री गस्तीवर होते. दीड वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना त्यांना आढळून आली. त्यामुळे पवार आणि त्यांच्या साथीदाराने वाशी सेक्टर-११ येथे सदर गाडी अडवून तपासणीसाठी त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे व लायसन्सची मागणी केली. याचवेळी त्या ठिकाणी दुसऱ्या कारमधून आलेल्या तिघा तरुणांनी दोघा पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्याशी भांडण काढले. त्यानंतर त्यातील काही तरुणांनी किशोर पवार यांच्या डोक्यामध्ये कुठल्यातरी वस्तूने मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पवार यांचे सहकारी असलेल्या दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण करून पलायन केले. या मारहाणीच्या घटनेनंतर जखमी झालेल्या पवार यांनी घडल्याप्रकराची माहिती वाशी पोलीस तसेच नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करुन दोन वाहनांमधून पळून गेलेल्या टोळक्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हाती कुणीच लागले नाही. त्यामुळे दोन्ही गाडीतील सहा ते सात जणांच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करुन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गस्तीवरील दोन पोलिसांना मारहाण
By admin | Published: May 11, 2015 1:57 AM