वाशी स्थानकातील दोन आरक्षण खिडक्या बंद; प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:15 AM2020-01-03T01:15:40+5:302020-01-03T01:15:43+5:30
कर्मचाऱ्यांकडून मनमानी होत असल्याचा आरोप
नवी मुंबई : लांबपल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटासाठी वाशी रेल्वे स्थानकात चार खिडक्या आहेत. मात्र, अनेकदा एक किंवा दोनच खिडक्या सुरू असतात. विशेषत: गर्दीच्या वेळी हा प्रकार सर्रास घडत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गैरसोय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वाशी स्थानकात लांबपल्ल्याच्या रेल्वे आरक्षणासाठी चार खिडक्या आहेत. यापैकी एक चौकशी विंडो आहे. तर उर्वरित तीन खिडक्या तिकीट आरक्षणासाठी आहेत. वाशी स्थानक मुंबई व ठाणे या शहराच्या दृष्टीने मध्यवर्ती आहे. तसेच विविध कामाधंद्यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. या पार्श्वभूमीवर तिकीट आरक्षणासाठी वाशी स्थानक सोयीची ठरते. त्यामुळे या स्थानकात तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मात्र, हमखास गर्दीच्या वेळी येथील चारपैकी दोन खिडक्या बंद ठेवल्या जातात. त्यामुळे उर्वरित दोन खिडक्यासमोर नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागतात.
यासंदर्भात कोणी विचारणा करण्याचा प्रयत्नही केला तरी तेथील कर्मचाºयांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे आरक्षण खिडक्या असूनही नागरिकांचा खोळंबा होत आहे. येथील कर्मचाºयांच्या मनमानीमुळेच हा त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाºयांना समज द्यावी किंवा अनियमितपणे खिडक्या बंद ठेवण्याचे प्रयोजन काय असते, हे तरी उघड करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.