अलिबाग : दुर्मीळ आणि अतिसंरक्षित वन्य सस्तन प्राणी श्रेणीतील ८० लाख रुपये किमतीच्या दोन खवल्या मांजरांच्या तस्करी करणाºया पाच जणांना श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी-खेडी येथे सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकाने शनिवारी ही कारवाई केली.
श्रीवर्धन-शेखाडी रस्त्यालगत असणाºया नजफ आराई यांच्या फार्महाऊसवर करण्यात आलेल्या कारवाईत फैजल अब्दुल अजीज काळोख (४२, रा.घोली मोहल्ला, ता.श्रीवर्धन), नीलेश अनंत कर्नेकर (३२, रा.जीवनेश्वर पाखाडी, ता.श्रीवर्धन), अशोक गणपत दर्गे (५५, रा.कसबापेठ, ता.श्रीवर्धन) आणि किशोर महादेव मोहिते(४३, रा.खेडी ता. श्रीवर्धन) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दोन खवल्या मांजरांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ८० लाख रुपये आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोसई आर.बी. वळसंग व पोलीस पथक यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी जप्त केलेली दोन खवल्या मांजरे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.