अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : यंदा कोरोनाचे संकट असले तरी वाहन उद्योगासाठी गेला पंधरवडा मध्यम ठरला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत २ हजार ४१ वाहने रस्त्यावर उतली आहेत. गतवर्षी प्रमाणे यंदा दुचाकींची विक्री मध्यम ठरली आहे. तर गतवर्षीपेक्षा यंदा ३०० चार चाकींची विक्री अधिक झाली आहे. त्याचबरोबर इतर मालवाहतूक वाहने, तीन चाकी वाहनांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेवर आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. जूनपासून अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत हळूहळू आर्थिक उलाढाल होण्यास मदत होऊ लागली आहे. यंदा दिवाळीत खरेदी-विक्री झाल्याने बाजारपेठेने मोठी उसंडी मारली आहे. वाहन खरेदीत यंदा दुचाकींची मध्यम प्रमाणात विक्री झाली आहे. तर चार चाकी विकत घेण्यास ग्राहकांनी जास्त प्रमाणात पसंती दिली आहे. नवरात्रौत्सवात वाहन विक्री कमी प्रमाणात झाली होती. तर दिवाळीत वाहन खरेदीत तेजी आली आहे. दुचाकी, चार चाकी वाहनांबरोबरच मालवाहतूक वाहने, तीन चाकी वाहनांचीदेखील विक्री झाली आहे.
कोरोना काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे दुचाकी घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन काळात परिस्थिती बिकट होती. जूननंतर कामावर जाण्यासाठी आगोदर बसने प्रवास करावा लागत होता. आता बसमध्ये कोरोनाची भीती वाटत आहे. माझ्याकडील आर्थिक बाबी सुरळीत झाल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी घेण्याचा योग आला.- किशोर सानप, दुचाकी ग्राहक
वर्षभर दुचाकीसाठी पैसे साठवले होते. चांगली बाइक घेण्याचे नियोजनही केले होते. परंतु कोरोनामुळे निराशा झाली होती. कोरोना काळात साठविलेले काही पैसे खर्चही झाले. जूनपासून कामावर जात आहे. आगोदरची दुचाकी खराब झाली आहे. आता नवीन घेण्यासाठी लोन पास झाल्याने दिवाळीत दुचाकी खरेदी केली आहे. त्यामुळे आता दिलासा मिळाला आहे. - आशिष पवार, दुचाकी ग्राहक
कोरोनाचे सावट असले तरी यंदा घर खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवाळीदरम्यान पनवेल परिसरात प्लॅट, प्लॉट, रो हाउस, शॉपची विक्री झाली आहे. यंदा बँकाचे व्याजदर कमी झाले आहेत. त्याचबरोबर मुद्रांक शुल्कात सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला उभारी मिळाली आहे.
कोरोनामुळे जास्त प्रमाणात एकटे वावरण्यासाठी चार चाकींच्या मागणीत वाढ झाली आहे. दसरानिमित्त बुकिंग कमी झाली होती. परंतु दिवाळीचा मुहूर्त त्याचबरोबर स्वत:च्या वाहनातच प्रवास करण्याची मानसिकता तयार झाल्याने यंदा चार चाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. - संतोष सगर, शाेरूम मालक
लाखाच्या वरील दुचाकींची मागणी जास्तदिवाळीच्या काळात दुचाकी खरेदी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. यात स्पोर्टस् बाइकची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. जास्त प्रमाणात तरुण वर्ग याकडे आकर्षिला जात आहे. खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त उपयुक्त असल्याने या सणात वाहन खरेदी जोमाने केली जाते. दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर तरुण वर्ग दुचाकी शोरूममध्ये गर्दी करायला सुरुवात करतो. यंदा कोरोनाचे सावट असले तरी दुचाकीच्या मागणीत घट झाली नाही.