उरण : माहितीच्या अधिकारातून माहिती मागूनही दिली नसल्याचा ठपका ठेवत उरण नगर परिषदेचे तत्कालीन जनमाहिती अधिकारी अनुपकुमार कांबळे यांना राज्य माहिती आयुक्त टी.एफ. थेकेकर यांनी दोन हजार रु पये दंड ठोठावला आहे.उरण येथील मोहन माळी यांनी नगर परिषदेच्या हद्दीत शीला चोणकर आणि उरणमधील नामांकित बिल्डर रमझान शेख यांनी केलेल्या नवीन बांधकामाबाबत माहिती मागितली होती. १० आॅक्टोबर २०१२ रोजी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती मुदतीनंतरही जनमाहिती अधिकारी कांबळे यांनी दिली नाही. त्यामुळे माळी यांनी प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. त्यानंतर अपील मान्य करून ३० दिवसांनंतर विनामूल्य माहिती देण्याचे आदेश नोव्हेंबर २०१४ रोजी देण्यात आले होते. मात्र सुनावणीदरम्यान तत्कालीन जन माहिती अधिकारी अनुपकुमार कांबळे यांनी कोणताही खुलासा दिला नाही. त्यामुळे तत्कालीन जनमाहिती अधिकारी अनुपकुमार कांबळे यांना राज्य माहिती आयुक्त टी.एफ.थेकेकर यांनी दोन हजार रु पये दंड ठोठावला आहे. तसेच विद्यमान जनमाहिती अधिकारी झेड. आर. माने यांनी तक्रारदार माळी यांना १५ दिवसात माहिती देण्याचेही आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिले आहेत. (वार्ताहर)
अधिकाऱ्यास दोन हजार दंड
By admin | Published: August 06, 2015 11:40 PM