तुर्भे विभागातून दोन टन प्लास्टीक साठा जप्त; महानगरपालिकेच्या पथकाची कारवाई
By नामदेव मोरे | Published: December 23, 2022 05:08 PM2022-12-23T17:08:08+5:302022-12-23T17:08:14+5:30
प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी व ग्राहकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टीक विरोधात मोहीम सुरु केली आहे. तुर्भे विभाग कार्यालयाने दोन टन ३० किलो प्लास्टीक जप्त केले असून ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. दहा दिवसांपूर्वीही १२०० किलो प्लास्टीक साठा जप्त करण्यात आला होता.
प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी व ग्राहकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतरही नियमांचे उल्लंघन करणारांविरोधात कारवाई सुरु केली आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, तुर्भेचे विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक विरोधात मोहीम राबविली जात आहे. बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील विधी प्लास्टीक गोडाऊन, ग्रोम सेंटरमधील गाला ब्रदर्स,जयेश कुमार, सिंघवी प्लास्टिक या व्यवसायीकांवर यापुर्वी कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला होतचा. त्यांच्यावर दुसऱ्यांदा कारवाई करून प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यांच्याकडील सर्व प्लास्टीक साठाही जप्त केला आहे. मर्चंट सेंटर मधील न्यू मार्ट आणि ओम फरसाण मार्ट या दोन दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्यामुळे त्यांच्याकडूनही प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.२१ डिसेंबरलाही सेक्टर १९ मधील थर्माकोल गोडाऊनवर अचानक छापा टाकून २३९ बॉक्समधून ३५० किलो वजनाचे थर्माकॉल जप्त कण्यात आले असून त्यांच्याडून १० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
शहर प्लास्टीकमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. नागरिकांनी प्लास्टीक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. व्यापाऱ्यांनीही बंदी असलेल्या प्लास्टीकचा व्यापर करू नये असे आवाहन मनपा अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्लास्टीक पिशव्या व वस्तुंची खरेदी, विक्री, साठवणूक, वाहतूक व वापर करण्यास बंदी आहे. प्लास्टीकमुक्त शहर करण्यासाठी महनगरपालिका आयुक्तांच्या मार्गर्शनाखाली व्यापक जनजागृती सुरु आहे. जनजागृतीनंतरही प्लास्टीकचा वापर करणारांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जात आहे.
- सुखदेव येडवे, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तुर्भे