मेट्रोच्या दोन मार्गांचे काम लवकरच सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:36 AM2019-06-12T02:36:16+5:302019-06-12T02:36:28+5:30
डीएमआरसीची नियुक्ती : पहिल्या मार्गावर नोव्हेंबरमध्ये चाचणी
नवी मुंबई : नवी मुंबईमेट्रोच्या मार्ग क्रमांक २ व ३ चे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी २८२० कोटी रुपये खर्च केले जाणार असून हे काम दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनला देण्यात आले आहे. ३०६३ कोटी रुपये खर्च करून सुरू असलेल्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असून नोव्हेंबरमध्ये मेट्रोची चाचणी होणे अपेक्षित आहे.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची सिडकोच्या माध्यमातून अंमलबजावणी सुरू आहे. पनवेल व नवी मुंबईमधील विविध नोड्स एकमेकांशी जोडण्यासाठी २०११ पासून उन्नत मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. मेट्रो प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन (डीएमआरसी)ला २००९ - १० मध्येच देण्यात आले आहे. त्यानंतर मार्ग क्रमांक ३ व ४ करिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे आणि मार्ग क्रमांक २ करिता आधी तयार केलेल्या डीपीआरचे प्रमाणीकरण करण्याचे काम राईट्स कंपनीला २०१७ मध्ये देण्यात आले होते. त्यानुसार मार्ग क्रमांक १ बेलापूर ते पेंधर (११ किलोमीटर) मार्ग क्रमांक दोन खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी(७.१२ किलोमीटर), मार्ग क्रमांक ३ पेंधर ते तळोजा एमआयडीसी (३.८७ किलोमीटर) व मार्ग क्रमांक ४, खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (४.१७ किलोमीटर)असे चार मार्ग प्रस्तावित केले आहेत.
मार्ग क्रमांक १ वर ११ स्थानके व १ आगार अशी रचना करण्यात आली आहे. यासाठी ३०६३ कोटी ६३ लाख रुपये खर्च होणार आहेत. या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या मेट्रोचे चीनहून आयात करण्यात आलेले सहा डबेही तळोजा आगारात दाखल झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये चाचणी अपेक्षित असून राईट्स कंपनीने सादर केलेले डीपीआरला सिडकोने नुकतीच मंजुरी दिली आहे.
मार्ग क्रमांक २ व ३ याकरिता २८२० कोटी २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.मार्ग क्रमांक २ व ३ साठी डीएमआरसीची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावास सिडको संचालक मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. मार्ग क्रमांक ४ करिता १७५० कोटी १४ लाख रुपये खर्च होणार असून पुढील मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे ते काम करण्यात येणार आहे.
२७१ स्थानके उभारण्याचा अनुभव
नवी मुंबई मेट्रोच्या मार्ग क्रमांक २ व ३ ची निर्मिती करण्याचे काम डीएमआरसीला देण्यात आले आहे. सदर कंपनीने दिल्लीमध्ये ३७३ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे निर्माण केले आहे. २७१ स्थानके उभारली आहेत. दिल्लीमधील सार्वजनिक वाहतुकीला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हा अनुभव गृहीत धरून नवी मुंबई मेट्रोचे कामही त्यांना देण्यात आले आहे.