नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हलच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. या वेळी दुचाकीस्वाराला जखमी अवस्थेत घटनास्थळी सोडून ट्रॅव्हलचालकाने पळ काढला. त्याच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पामबीच मार्गावर सतरा प्लाझालगत शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पाम बीच मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून अतिशय वेगाने वाहने पळवली जात आहेत. कोपरखैरणे ते वाशी दरम्यानचे प्रवासी घेण्यासाठी त्यांच्याकडून पाम बीच मार्गाचा वापर होताना दिसून येत आहे. यामुळे सदर मार्गावर दुचाकीस्वारांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. अशाच खासगी ट्रॅव्हलचालकाच्या हलगर्जीमुळे वाशीत राहणाऱ्या सचिन रोडे (४०) यांचा मृत्यू झाला आहे.
रोडे हे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या ट्रॅव्हल (एम.एच.०४ जी.पी. २१५७)ने त्यांना धडक दिली. यामुळे दुभाजकाला धडकून रोडे हे खाली पडले असतानाही ट्रॅव्हलचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत तिथून पळ काढला. अखेर त्या ठिकाणावरून जात असलेल्या सुलतान सिद्धिकी या रिक्षाचालकाने पोलिसांना घटनेची माहिती देऊन रोडे यांच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी रोडे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रॅव्हलचालकावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.