नवी मुंबई : वाहनचोरी करणाऱ्या त्रिकुटाला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ५ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून ४ गुन्हे उघड झाले आहेत. त्यांनी चोरलेल्या दुचाकीत जीपीएस लावून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी सापळे रचले जात आहेत. त्यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडून देखील दुचाकीचोरांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान सीसीटीव्हीच्या तपासात एक टोळी दुचाकी चोरल्यानंतर वाशी परिसरात लपवत असून, काही वेळाने तिथून त्या इतर ठिकाणी हलवत असल्याचे समजले होते. त्यानुसार गुन्हेगांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, पोलिस नाईक राठोड, भालेराव, घुगे आदींचे पथक केले होते. त्यांनी वाशी परिसरात शोध घेतला असता एक चोरीची दुचाकी उभी केल्याचे आढळून आले. त्याद्वारे चोरट्यांपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी त्या दुचाकीत जीपीएस बसवले होते.
काही वेळाने चोरटयांनी हि दुचाकी इतर ठिकाणी हलवली असता पोलिसांना त्याची माहिती मिळत गेली. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच त्यांना गाडीत जीपीएस असल्याचा संशय आला. यामुळे त्यांनी गाडीतले जीपीएस शोधून ते काढून टाकले होते. परंतु तोपर्यंत गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळाल्याने शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. नुरुल उर्फ नूर जैनुल अब्दुल लब्बई (२१), सलमान उर्फ सामी अयुब खान (१९) व जॉय जिओ बिनॉय (२१) अशी त्यांची नावे आहेत. नूर हा शिरवनेचा तर जॉय उलवेचा राहणारा आहे. त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या असून वाहनचोरीचे चार गुन्हे उघड झाले आहेत.