शहरातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे, वाहतूक पोलिसांची १४४७ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 07:02 AM2017-11-29T07:02:44+5:302017-11-29T07:02:52+5:30
नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा
नवी मुंबई : नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा लावणा-यांवरही कारवाईची संख्या मोठी असल्याने काळ्या काचांमागचे गूढ काय हे अद्याप उघड झालेले नाही.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे पालन व्हावे व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती. या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार यांनी सर्व युनिटच्या अधिकाºयांना दिले होते. त्यानुसार आयुक्तालय क्षेत्रात सर्वच ठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी विना हेल्मेट दुचाकी चालवणाºयांसह फॅन्सी नंबरप्लेट तसेच काळ्या काचा वापरणाºयांवर कारवाई करण्यात आली. यादरम्यान आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण २४६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये वाहनांना काळ्या काचा लावल्याप्रकरणी ४३२ जणांवर तर फॅन्सी अथवा अस्पष्ट नंबरप्लेट प्रकरणी ५८३ कारवाया झालेल्या आहेत. तर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याप्रकरणी तब्बल १४४७ जणांवर कारवाई झाली आहे. त्यावरुन शहरातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे दिसून येत आहे.
वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी यापूर्वी देखील वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारे धडक कारवाईची मोहीम राबवलेली आहे. त्यावेळी देखील सर्वाधिक कारवाया हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर झाल्या होत्या. त्यामध्ये तरुणाईचा सर्वाधिक समावेश असल्याने त्यांना शिस्त लावण्यासाठी महाविद्यालयांच्या बाहेर मोहीम राबवून त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्तीचे धडे देखील देण्यात आले होते. दुचाकीच्या अपघातामध्ये प्राण जाण्याची शक्यता अधिक असल्याने हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही बहुतांश दुचाकीस्वारांमधला बेशिस्तपणा कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तर गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी वाहनांना काळ्या काचा वापरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यानंतरही व्हीआयपी थाट म्हणून अनेक जण कारच्या काचांना काळी फिल्म लावतात, परंतु रात्रीच्या वेळी काळ्या काचांमुळे अनेकांचे अपघात देखील झालेले आहेत. त्यानंतरही काळ्या काचांचा मोह कायम असल्याने, अशा वाहनांमध्ये नेमके दडलेय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
हेल्मेट न वापरल्याने किरकोळ अपघातामध्ये देखील दुचाकीस्वाराचे प्राण गेल्याच्या घटना शहरात घडलेल्या आहेत. ठाणे-बेलापूर मार्गासह पामबीच मार्गावर सर्वाधिक अशा घटना घडल्या आहेत. अशावेळी दुचाकीस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटना नक्कीच टळतील.
वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने नियम पाळल्यास स्वत:चे व इतरांचे प्राण नक्कीच वाचतील. परंतु अद्यापही अनेक जण वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्यावर कारवाईच्या उद्देशाने दहा दिवसांची विशेष कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती. त्यात एकूण २४६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
- नितीन पवार,
पोलीस उपआयुक्त,
वाहतूक शाखा