खोपोली : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसला गुरूवारी दुपारी अपघात झाला. यात दोन महिला जागीच ठार झाल्या.बंगळुरू येथून मुंबईकडे २० प्रवासी घेऊन निघालेली खासगी आराम बस गुरूवारी दुपारी ३.३० च्या सुमारास माडप बोगद्याजवळ आली. बसचा वेग जास्त असल्याने बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस बोगद्याजवळ उलटली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन अत्यवस्थ असून सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी काही येमेन देशाचे नागरिक होते. अपघातात फातिमा दहिफ अल्लाह सालेह (८९, रा. येमेन) व कविता शरद पोलंगे (४१, रा. ठाणे ) या दोन महिला जागीच ठार झाल्या. जय प्रकाश तोडी (रा. सुरत), फाहील रिझवान (१७, रा. मुंब्रा), चांद पाशा तुंगुर व हुसेम मोहोमद (रा. यमेन), राम सहान (६९, ठाणे) आणि ईमाम मुल्ला (४४, उस्मानाबाद) अशी जखमींची नावे आहेत.खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताची चौकशी सुरू आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघात घडल्यानंतर काही वेळ मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. पण अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली.