नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीत गटारीचे चेंबर साफ करताना, रसायनाच्या उग्र वासाने गुदमरून तीन कामगार बेशुद्ध पडून दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघड झाली. या दुर्घटनेप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून साइट सुपरवायझर दत्तात्रेय गिरधारीला अटक करण्यात आली.
रबाळे एमआयडीसीतील प्रोफॅब कंपनीसमोरील रस्त्यावर शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. या परिसरातील गटार तुंबली होती. त्यामुळे गटारीचे चेंबर साफ करण्याचे काम बिटकॉन ऑफ इंडिया या कंपनीला दिले होते. त्यानुसार, साइट सुपरवायझर दत्तात्रेय गिरधारी चार कामगारांना घेऊन तेथे गेले होते. यावेळी विजय हॉदसा (२९), संदीप हांबे (३५) व सोनोत हॉदसा हे तिघे गटारीच्या चेंबरमध्ये उतरले होते, तर मुर्तुजा शेख (३०) हा चेंबरच्या बाहेर मदतीला उभा होता. चेंबरमध्ये उतरून तिघे स्वच्छ करत होते. त्याच वेळी चेंबरमध्ये अचानक रसायनाच्या उग्र वास येऊ लागला.
या वासामुळे तिघेही चेंबरमध्ये बेशुद्ध पडले. शेख याच्या हा प्रकार लक्षात येताच, परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना चेंबरमधून बाहेर काढण्यात आले. तिघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान विजय व संदीप यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोनोत यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साइट सुपरवायझर दत्तात्रेय गिरधारी याला न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारीनंतरही दुर्लक्षया दुर्घटनेमुळे रसायनमिश्रित दूषित सांडपाणी गटारांमध्ये सोडले जात असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. काही कारखाने थेट गटारात दूषित सांडपाणी सोडत असल्याने, ते घणसोली, पावणे परिसरातील नाल्यातून वाहताना दिसते. या पाण्यामुळे वनस्पती व सागरी जीवांनाही हानी पोहोचत आहे.