मयूर तांबडे
नवीन पनवेल : तालुक्यातील भानगर जवळील गाढी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सौम्यरंजन शरदकुमार दास (वय 25) राहणार आदई आणि श्रेयस रामचंद्र शेनवी (17 राहणार आदई) अशी दोघांची नावे आहेत. याची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
आदई येथील सौम्यरंजन आणि श्रेयस हे दोघे 27 फेब्रुवारी रोजी घरातून पोहण्यासाठी मोटरसायकलने नेरे येथे जाऊन येतो असे सांगून निघून गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी खांदेश्वर पोलीस ठाणे येथे हरवली असल्याची तक्रार केली होती. 28 फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावाजवळ नदीमध्ये या दोन्ही तरुणाचा मृतदेह सापडून आला. या गाढी नदीमध्ये पाणी खोल असल्याने त्याचा या दोघांना अंदाज आला नसेल आणि त्यामुळे या दोघांचा मृत्यू असेल असे सांगितले जात आहे. तालुका पोलिसांनी अग्निशामक दलाची मदत न घेता जवळच्या गावातील ग्रामस्थांना घेऊन हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले. यातील सौम्य रांजन दास हा नेव्ही मध्ये कामाला होता आणि त्याला चांगलं पोहता येत होतं. नदीमध्ये पोहताना सतरा वर्षीय श्रेयस हा आधी बुडला असावा आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेला सौम्य रंजन देखील बुडाला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालुका पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दरवर्षी गाढी नदीच्या परिसरात पोहण्यासाठी गेल्यानंतर काही पर्यटकांचा यात मृत्यू होतो. पाण्याचा अंदाज न आल्याने बऱ्याच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पाण्यात न जाण्याचे आवाहन तालुका पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र त्याला पर्यटक जुमानत नाहीत.