लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : उबेर चालकाने मद्यधुंद अवस्थेत कार पळवून कारमधील महिला व तिच्या दिड वर्षाच्या मुलीला धोका निर्माण केला होता. तर महिला मदतीसाठी आरडा ओरडा करत असल्याचे पाहून एका कार चालकाने वाशीत त्याच्या कारला स्वतःची कार आडवी घालून त्याला थांबवल्याने कारमधील मायलेकींनी सुटका झाली.
चेंबूर येथून कामोठेला येणाऱ्या मानसी सोनावणे (२८) यांच्यासोबत हि घटना घडली आहे. त्या माहेरी गेल्या असता परत सासरी जाण्यासाठी उबेर कार केली होती. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास त्या दिड वर्षाच्या मुलीसह उबेर कारने कामोठेकडे चालल्या होत्या. प्रवासादरम्यान वाशी टोलनाका येथे उबेर चालकाने विनाकारण हॉर्न वाजवण्यास सुरवात केली. यामुळे समोरील एका कारमधील व्यक्तीने त्याच्याकडे येऊन जाब विचारला. यावेळी झालेल्या वादावादीत उबेर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मानसी ह्या मुलीला घेऊन कारमधून उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच उबेर चालकाने दरवाजे लॉक करून वेगात कार पळण्यास सुरवात केली. यामुळे अपघाताचा धोका असल्याने त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरवात केली. त्यानंतरही चालक कार थांबवत नव्हता.
अखेर त्याच मार्गाने जाणाऱ्या एका कार चालकाने कारमधील महिला बचावासाठी ओरडत असल्याचे बघून वाशी प्लाझा लगत त्याने स्वतःची कार उबेरच्या आडवी घातली. यामुळे उबेर थांबताच मानसी व त्यांची मुलगी सुरक्षित बाहेर पडले. मात्र त्यानंतरही संधी मिळताच मद्यधुंद उबेर चालकाने तिथून पळ काढला. या घटनेप्रकरणी महिलेने वाशी पोलिसांकडे तक्रार केली असता उबेर चालक रामदास सुतार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.