नवी मुंबई : बॉयलर हा उद्योगांचा आत्मा आहे. बॉयलर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करेल. राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठीही सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र कामगार विभाग बाष्पके संचालनालय यांच्या वतीने बॉयलर इंडीया २०२२ या तीन दिवसांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत यांनी या प्रदर्शनामुळे उद्योगवृद्धीसाठी फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.
बॉयलर उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनामुळे सर्वांना होईल. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी व राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. लहान - मोठ्या बहुतांश उद्योगामध्ये बॉयलरचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रातही बॉयलरचे उत्पादन केले जाते. या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी नवी मुंबईमध्ये तीन दिवसाच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात विविध तज्ञ मार्गदर्शन करणार असून त्यामुळे नवीन तंत्रज्ञान व सुरक्षेविषयीची माहिती सर्वांना उपलब्ध होणार आहे.सिडको प्रदर्शन केंद्रात १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान बॉयलर इंडीया प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये २८० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. तीन दिवस चर्चासत्राची ३० सेशन होणार असून देश, विदेशातील ७० मान्यवर बॉयलर उद्योगाविषयी माहिती देणार आहेत. प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी विदेशातूनही तज्ञ आले आहेत.