नवी मुंबई - उद्धवसेना म्हणजे ‘युज अँड थ्रो पार्टी’ असून, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत अडकला आहे. तीन हजार कोटी वर्षी खड्ड्यात घातले जात होते. आम्ही आता त्यांचा धंदा बंद केला आहे. आम्ही रस्ते धुतले तर त्यांनी मुंबईची तिजोरी धुतली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नवी मुंबईमधील उद्धवसेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते. राजा का बेटा राजा नही बनेगा जो मेहनत करेगा वही राजा बनेगा. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे सर्व जण आपले सवंगडी आहेत. उद्धवसेना सवंगड्यांना घरगडी समजत होते. महापालिकांमध्येही युतीचा भगवा फडकेल. राज्यात सर्वत्र पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जणांनी प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादी हल्ल्याचा निषेधकाश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या हल्ल्याला जशास तसे उत्तर देतील. देशवासीयांच्या मनात पाकिस्तानविषयी चीड निर्माण झाली असून, भारतीय जवान चोख उत्तर देतील, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
आम्ही देणारे आहोत... नवी मुंबईमधील माथाडीसह एलआयजी घरांवर कारवाई होऊ दिली जाणार नाही. कंडोनियमअंतर्गत कामांसाठी विशेष निधी दिला जाईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहे. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले. यावेळी आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख किशोर पाटक, द्वारकानाथ भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.