नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नागरिकांना ३०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने वाशीतील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करून अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
उद्धव सेनेचे ऐरोली जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वाशी सेक्टर १७ मधील महावितरण कार्यालयाबाहेर शिवसैनीकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातील सर्व नागरिकांना ३०० युनीटपर्यंत वीज मोफत मिळाली पाहिजे. शहरी भागातील नागरिकांनाही मोफत वीज मिळाली पाहिजे. वाढीव अनामत शुल्क आकारू नये. ग्राहकांकडून अवास्तव बीलाची वसुली केली जात असल्याबद्दल सरकारचा निषेध केला. महावितरण अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासोबत महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, सुमीत्र कडू, प्रकाश पाटील, काशीनाथ पवार, सतीश रामाणे, तानाजी जाधव, अतुल कुलकर्णी, जितेंद्र कांबळी, एकनाथ दुखंडे, बाबाजी इंदोरे, विकी विचारे, संतोष घोसाळकर, बाळकृष्ण खोपडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.