कमळगौरी हिरु पाटील संस्था, तळोजा ह्यांच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालया’चं उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी चांगले वकील ही तळागाळातील समाजाची गरज झाली असून ह्या महाविद्यालयातून निष्णात वकीलांची फौज निर्माण होतील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
पनवेलमधील शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत आहे. आपण सर्व शिवसेनेच्या मागे पुन्हा खंबीर उभे राहून येत्या निवडणूकीत मावळचा खासदार शिवसेनेचा निवडून आणणार असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाचं नाव दि. बा. पाटील दिल होतं. त्याचं पुढे काय झालं?, अजूनही ते का दिल गेलं नाही?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आम्ही स्थानिकांच्या भावना जपतो, त्यांच्या भावनांशी खेळत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आजपर्यंत भाजपाएवढा खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आलेला नाही. ‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, तर पक्ष फोडाफोडी कशाला करताय?, असं म्हणत शिवसेना नसती आणि शिवसेनेनं तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता, तर तुम्हाला खांदा द्यायलाही चार लोक आली नसती, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. भाजपा हा पक्ष नाही ती सडकी, कुजकी वृत्ती आहे. देशातून हि वृत्ती आपल्याला तडीपार करावीच लागेल. तर आणि तरच आपल्या देशात ‘अच्छे दिन’ येतील, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. तसेच येणारी निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशीच होणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.