नवी मुंबई : कारवाईचा दाख व इतर अमिष दाखवून मिंधे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. वैयक्तिक स्वार्थामुळे काहींनी तिकडे उड्या मारून स्वत:चे नुकसान करून घेतले असून त्यांच्यासोबत प्रभागातील कोणीही पदाधिकारी गेले नसल्याचा दावा शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शहर प्रमुख व दोन उपजिल्हा प्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सोमवारी प्रवेश केला. याविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. १३० पेक्षा जास्त पदाधिकारी प्रवेश करणार असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात ५ ते ७ जणांनीच प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या वार्डामधील पदाधिकारीही गेलेले नाहीत. कोणी म्हणाले माझ्या हॉटेलला कारवाईची नोटीस आली आहे. कोणी म्हणाले माझी नोकरी धोक्यात आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करतील अशी कारणे देऊन ते तिकडे गेले आहेत. पण त्यांच्यासोबत विभागातील पदाधिकारी गेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनाधार भक्कम आहे. पक्षाच्यावतीने नेरूळ, सानपाडामध्ये सभांचे अयोजन केले आहे. पक्ष ताकदीने यापुढेही काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, सुमीत्र कडू, विजयानंद माने, आरती शिंदे, संदीप पाटील, विशाल विचारे, महेश कोठीवाले, संदीप पवार, नरेश चाळके, मनोज इसवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.