मधुकर ठाकूर, उरण : नोव्हेंबर महिन्यात अकस्मित निधन झाल्यानंतर शाळेच्या रजिस्टरमधुन नावही कमी करण्यात आले आहे.मात्र त्यानंतरही येथील युईएस शाळेने पालकांना त्वरित फी भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.युईएस शाळा व्यवस्थापनाच्या या अघोरी संतापजनक प्रकारामुळे मात्र येथील पालक, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची १२ पर्यंत शाळा आहे.या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हनुमान कोळीवाडा येथील रहिवासी भक्तेश म्हात्रे यांच्या आठ वर्ष वयाच्या दोन जुळ्या मुली दुसरीत शिकत होत्या. या दोन जुळ्या मुलींपैकी हर्षी हिचे १ नोव्हेंबर २०२२ रोजी दुदैवाने अकस्मित निधन झाले आहे.मुलीच्या निधनानंतर पालकांनी वर्ग शिक्षक,शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन याबाबत माहिती दिली आहे.मृत्युपत्र सादर करुन हर्षीचे नावही शाळेच्या रजिस्टर मधुन नोव्हेंबर महिन्यातच कमी केले आहे. मात्र चिमुकल्या हर्षीच्या अकस्मित दुदैवी निधनाने पालक दुखातुन अद्यापही सावरलेले नसताही २४ फेब्रुवारी रोजी शाळा व्यवस्थापनाने मृत हर्षीची माहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत ६००० रुपये फी तत्काळ भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.युईएस शाळा व्यवस्थापनाच्या या संतापजनक प्रकारामुळे मात्र येथील पालक, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शाळा व्यवस्थापनाचा हा प्रकार मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आणि संतापजनक आहे.कोरोना काळातही शाळेने शासनाच्या आदेशानंतरही शाळा बंद असतानाही पालकांकडून सक्तीने फी वसूल केली आहे.आता पुन्हा ३१ टक्के फी वाढीचा प्रस्ताव आणला आहे.विचारणा करणाऱ्यांना व्यवस्थापनाकडून फी परवडत नसेल तर पाल्यांना म्युनिसिपल शाळेत घाला अशी दुरुत्तरे दिली जात आहेत.अशी माहिती युईएस शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्राजक्ता गांगण यांनी दिली.
शाळा व्यवस्थापनाची चुक झाली आहे.फी वसुलीसाठी नोटीस काढणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन माफीही मागितली असल्याची माहिती युईएस संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"