अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात महागाईने डोके वर काढल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पेट्रोल, डिझेलबरोबर गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने गृहिणींची गृहखर्च सांभाळताना तारांबळ उडत आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरची होणारी भाववाढ न परवडणारी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील गृहिणींच्या घरी आता गॅस बंद करून पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून अनेकांना गॅस देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात आजघडीला ४ हजार ७०० उज्ज्वला गॅसचे लाभार्थी आहेत. त्यानुसार घरातील गृहिणींकडून चूल बंद करून गॅसवर स्वयंपाक तयार करण्यात येऊ लागला आहे.
कोरोनामुळे अगोदरच काम मिळत नाही. रोजगार कुठे मिळेल याचीच चिंता सतावत असते. सकाळी उठल्यावर कामाच्या शोधात दिवस जातो. काम न मिळाल्याने पोट भरायचे वांधे झाले आहेत. सरकारने गॅस दिला, पण सिलिंडर भरण्यासाठी झालेल्या भाववाढीमुळे गृहिणी हतबल झाल्या आहेत. वर्षभरात गॅसच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे मिळालेल्या रोजगारातून महागाईवरच खर्च होत असल्याची खंत महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला. परंतु हे सुख जास्त दिवस टिकले नाही. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. महागाई वाढल्याने घर चालवणे मुश्कील झाले आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे गॅस खरेदी करणे आता महिलांना न परवडणारे आहे. त्याकरिता घरातील गॅस बंद करून पुन्हा चूल पेटवली जात आहे. लाकडाचे इंधन वापरून स्वयंपाक बनवला जात आहे. महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.