उल्हासनगर : अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. शहर राहण्यास अयोग्य असल्याचा शेरा अहवालात मारण्यात आला असून त्यानंतरही उपाय करण्याऐवजी तो धूळखात पडल्याची टीका होत आहे. वर्षभरापूर्वी महासभेत हा अहवाल सादर झाला. यावर चर्चा करून उपाय योजना करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सोयीस्करपणे तो बासनात गुंडाळल्याची टीका होत आहे. शहर हितासाठी उपाययोजनेची मागणी नागरिकांसह समाजसेवकाकडून झाल्याने सत्य बाहेर आले. सांडपाणी, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, दूषित पाणीपुरवठा, आरोग्याचा अभाव, कचऱ्याचे ढिग, साफसाफईचा बोजवारा यावर अहवालात आक्षेप घेतला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५ लाख असून ती १३.३४ चौ.किमी. क्षेत्रफळात राहते. प्रत्यक्षात ९ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असून देशात सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे हे शहर आहे. तसेच ७० हजारापेक्षा वाहने आहेत. पार्किंगची व्यवस्था नसल्याने गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. भूयारी गटारीची क्षमता संपली असून पावसाळयात त्या ओव्हरफलो होऊन रस्त्यावरून वाहत आहेत. (प्रतिनिधी)
राहण्यास उल्हासनगर अयोग्य
By admin | Published: November 16, 2015 2:06 AM