उल्हासनगरची १८० शौचालये दुरवस्थेच्या गर्तेत
By admin | Published: May 11, 2016 02:03 AM2016-05-11T02:03:34+5:302016-05-11T02:03:34+5:30
शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे, यासाठी एमएमआरडीएने ३२ कोटी खर्च करून १८० दुमजली शौचालये बांधली. मात्र त्यांतील अनेकांचे काम निकृष्ट आहे.
उल्हासनगर : शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे, यासाठी एमएमआरडीएने ३२ कोटी खर्च करून १८० दुमजली शौचालये बांधली. मात्र त्यांतील अनेकांचे काम निकृष्ट आहे. काही तर धोकादायक बनली आहेत. ३० शौचालये कुलुपबंद आहेत. पालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असल्याने आता पालिकेनेच ती ताब्यात घ्यावी अशी मागणी सुरू झाली आहे.
देखभाल होत नसल्याने शौचालयांची दुरवस्था झाली असून आता पालिकेनेच ती ताब्यात घ्यावी, अशी मागणी रिपाईचे शहराध्यक्ष व नगरसेवक भगवान भालेराव यांनी केली आहे. प्रभागातील शौचालय ताब्यात घेवून त्यांनी नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे. नगरसेवक म्हणून मिळणाऱ्या मानधनातून ते त्याची निगा राखणार आहेत. तसाच प्रयत्न अन्य नगरसेवकांनाही करता येईल, असा विचारही त्यांनी मांडला आहे.
एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी उल्हासनगरला धावती भेट दिली होती. शहरातील अस्वच्छता पाहून त्यांनी शहरात शौचालयाची योजना राबविण्याची संकल्पना पालिकेसमोर मांडली. दुमजली शौचालयाची निगा राखणाऱ्या कामगाराला तेथेच वर एक खोलीही बांधून दिली आहे. शौचालयाला जागा पालिकेने दिली आहे. त्याजागी एमएमआरडीएने १८० शौचालये तीन टप्प्यात बांधून दिली आहेत. त्यावर ३२ कोटीचा खर्चही झाला आहे.
एमएमआरडीएने बांधलेल्या शौचालयातील अनेकांची कामे निकृष्ट झाली असून काही शौचालये तर धोकादायक बनली आहेत. ३० शौचालये अद्यापही कुलूप बंद आहेत. त्यांचे उद्घाटनच झालेले नाही. शौचालयाचे काम निकृष्ट करणाऱ्या संस्थेला एमएमआरडीएने काळया यादीत टाकले असून ही कारवाई त्यापुढे जाऊ शकलेली नाही. शौचालयाच्या नावाखाली कोटयवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असून निगा राखण्यासाठी ती स्थानिक समाजसेवा संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आली. महापालिकेने प्रत्येक शौचालयामागे निगा राखणाऱ्या संस्थेला वीज-पाणी बिलापोटी दरमहा दोन हजार रूपयेही दिले. स्थानिक नागरिकांकडून दरमहा दर आकारून शौचालयाची निगा राखण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. मात्र त्यात ते कमी पडले. मात्र या सर्व व्यवस्थेत गैरप्रकार वाढीस लागल्याने ती पालिकेने ताब्यात घेवून स्वत: चालविण्याची मागणी अनेक वर्षे होत आहे. त्याची सुरवात रिपाईचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी स्वत:च्या प्रभागापासून केली. प्रभागातील दोन शौचालये ताब्यात घेऊन त्यांची निगा त्यांनी बचत गटामार्फत सुरू केली. नगरसेवक मानधनातून दोन कामगारांची नियुक्ती केली आहे.
प्रत्येक घरी शौचालयाची योजना प्रशासन राबवित असून त्यासाठी पालिकेने आतापर्यंत दोन कोटीचा निधी खर्च केला आहे. ज्यांच्याकडे शौचालयासाठी जागा नाही, त्यांच्यासाठी पालिका आणि एमएमआरडीएच्या शौचालयाचा आधाार आहे. (प्रतिनिधी)