रोडपालीत अल्ट्रा मॉडर्न उद्यान; सिडकोचा प्रकल्प, ५७ लाख रुपयांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:01 AM2019-02-10T00:01:00+5:302019-02-10T00:01:14+5:30
सिडकोने साडेबारा टक्के योजनेंतर्गत रोडपाली विभागाचा विकास केला आहे; परंतु या ठिकाणी विरंगुळ्यासाठी एकाही उद्यानाची सुविधा देण्यात आली नाही.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : सिडकोने साडेबारा टक्के योजनेंतर्गत रोडपाली विभागाचा विकास केला आहे; परंतु या ठिकाणी विरंगुळ्यासाठी एकाही उद्यानाची सुविधा देण्यात आली नाही. या संदर्भात स्थानिक रहिवासी व सामाजिक संस्थांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत रोडपाली सेक्टर २० येथील सुमारे दीड एकर क्षेत्रफळाच्या जागेवर अत्याधुनिक दर्जाचे अल्ट्रा मॉडर्न उद्यान उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या कामासाठी निविदाही मागविण्यात आल्या असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ५७ लाख रुपये खर्च निर्धारित करण्यात आला आहे.
रोडपालीची जवळपास ७५ टक्के वसाहत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडावर वसली आहे. उर्वरित २५ टक्के भूखंड सिडकोच्या मालकीचे आहेत. एकूण ६० हेक्टर जमीन सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत खातेदारांनी दिली. मात्र, त्यापैकी चार टक्के क्षेत्र पायाभूत सुविधांकरिता राखीव ठेवले. म्हणजे तितके क्षेत्र प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीतून सिडकोने अगोदरच वर्ग केले; परंतु त्या जागेवर फारशा पायाभूत सुविधा विकसित करण्यात आलेल्या नाहीत. खारघरला पर्याय म्हणून अनेकांनी रोडपालीत घरे घेतली. मात्र, या भागात साधे उद्यानही नाही. याबाबत एकता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षे सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. त्याचबरोबर इतर रहिवासी संघटनांनी सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता, त्याची दखल घेत सिडकोने या परिसरातील सेक्टर २० मध्ये सुमारे दीड एकर क्षेत्रावर अल्ट्रा मॉडर्न उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.
प्रकल्पाचा खर्च
५७ लाख रुपये
रोडपाली येथील सेक्टर २० मधील भूखंड क्र मांक २६ येथे ५५७६ चौ.मी. क्षेत्रफळावर हे उद्यान विकसित होणार आहे. त्याकरिता ५७ लाख खर्च अपेक्षित आहे. यामध्ये संरक्षण भिंत, जॉगिंग ट्रॅक, आसन व्यवस्था, शौचालय तसेच वेगवेगळी झाडे आणि हिरवळ आदीसह अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा असणार आहेत.
विरंगुळा केंद्र आणि चिल्ड्रन पार्कचा प्रस्ताव
एकता सामाजिक सेवा संस्थेचे
अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी सिडकोच्या या आराखडाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर त्या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन पार्कची व्यवस्था करावी,
अशी मागणी पत्राद्वारे सिडकोकडे केली आहे.
रोडपालीकरिता अत्याधुनिक स्वरूपाचे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. संबंधित कामासाठी नऊ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, एकता सामाजिक सेवा संस्थेने चिल्ड्रन पार्क व विरंगुळा केंद्राची मागणी केली आहे, त्यानुसार हा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला जाईल.
- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, सिडको, कळंबोली