उमेदच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे नवी मुंबईत आयोजन

By कमलाकर कांबळे | Published: March 6, 2023 07:49 PM2023-03-06T19:49:06+5:302023-03-06T19:50:51+5:30

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 8 मार्चला उद्घाटन

umaid mahalakshmi saras exhibition organized in navi mumbai | उमेदच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे नवी मुंबईत आयोजन

उमेदच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे नवी मुंबईत आयोजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने  (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच वाशी  येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी 8 ते 19 मार्च 2023 या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2023” चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी आज सिडको भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळवून व्यवसायवृध्दी व्हावी असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

दरवर्षी मुंबईतील बांद्रा या ठिकाणी भरविण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवीमुंबईत भरविण्यात येणार आहे.  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2023 रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

महालक्ष्मी सरस प्रदर्शन एक अत्यंत नावीन्यपूर्ण आणि ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ आहे.  या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये साधारण ५११ स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण ११९ स्टॉल येणार आहेत तसेच नाबार्डचे ५० स्टॉल यात आहेत. प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपन्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉलचे मिळून भव्य असे फूड कोर्ट असणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसर, हातमागावर तयार केलेले कपड़े, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट,वारली आर्ट च्या वस्तू असणार आहेत. याशिवाय महिलांच्या आकर्षणाच्या अनेक प्रकारच्या ज्वेलरी,लाकडी खेळणी, इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल या प्रदर्शनात असणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता यावा याकरिता संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असणार आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी ( प्ले एरिया) उभारण्यात आला आहे.

ग्राम विकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन, ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, राजेश कुमार यांचे या प्रदर्शनाला नियमित स्वरुपात मार्गदर्शन लाभत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला हातभार लागावा यासाठी प्रदर्शनाला भेट देऊन शुद्ध खात्रीच्या वस्तू आणि पदार्थाची खरेदी करावी, नवी मुंबईकरांनी या प्रदर्शनाचा भरभरुन लाभ घ्यावा. असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी आज या पत्रकार परिषदेतून केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: umaid mahalakshmi saras exhibition organized in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.