उमरोलीचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:36 PM2019-07-08T23:36:47+5:302019-07-08T23:37:06+5:30
दरवर्षी मुसळधार पावसामुळे गाढी नदीला महापूर येतो. सोमवारी जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग ...
दरवर्षी मुसळधार पावसामुळे गाढी नदीला महापूर येतो. सोमवारी जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने सुमारे ५०० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. गावात येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. गावातील रिक्षाचालकांना रिक्षा घेऊन बाहेर जाता आले नाही. पुलावरून पाणी गेल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, रिक्षाचालक यांना त्रास सहन करावा लागला.
उमरोली येथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात गावात जाण्याचा मार्ग बंद राहत होता. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी होती. नाबार्डकडून उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरोली गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गाढी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला आहे. उमरोली येथील नागरिकांसाठी नवीन पूल उभारण्यात येईल, असे गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र यंदा जुन्या व छोट्या पुलावरून पाणी गेल्यामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पनवेल तालुक्यातील उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी उमरोली गावाचा संपर्क तुटतो. याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून उमरोली ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या आहेत. स्वातंत्र्य काळापासून उमरोलीवासीयांना पुलाचा प्रश्न सतावत आहे. २०१९ मध्ये १ कोटी ४६ लाख रुपयांच्या नवीन पुलाचे काम मंजूर करण्यात आले. त्यामुळे उमरोली येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यंदा पूल बांधून तयार होईल अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र जवळपास ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्णच आहे. पावसामुळे पुलासाठी लावलेले लोखंडी पाया देखील वाहून गेला आहे. दरम्यान संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
तुर्भेत चार घरे वाहून गेली
तुर्भे एमआयडीसी परिसरात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे चार घरे वाहून गेली. तिथल्या ओमकार कॉरीलगतच्या परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये मदन पवार, इंदर दळवी, मदन दळवी व दशरथ काटे यांचा समावेश आहे. पाण्याच्या प्रवाहात त्यांचे घर वाहून गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहेत, तर अजय डांगे व अशोक मांझी यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे.
रानसई धरण ओव्हरफ्लो
उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून धरण क्षेत्रात कोसळणारे पावसाचे पाणी आणि डोंगर माथ्यावरून वाहणारे पाणी थेट रानसई धरणात येवून मिसळत असल्याने सोमवारी दुपारपासून धरण दुथडी भरून वाहू लागल्याची माहिती एमआयडीसी उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.
घणसोली, कोपरखैरणेत वीज खंडित
दोन दिवसांपासून सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने घणसोलीसह कोपरखैरणेतील रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
घणसोली परिसरात दहा तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे तळवली, गोठीवलीसह घणसोली गावाचा निम्याहून अधिक भाग अंधारात होता. सुमारे दहा तासाहून अधिक काळ त्या परिसराची बत्ती गुल झालेली होती. तर मागील तीन दिवसांपासून त्याठिकाणी विजेचा हा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा संताप व्यक्त होत आहे. अशातच कोपरखैरणे सेक्टर २ व लगतचा परिसर सुमारे पाच तास अंधारात होता.
सोमवारी सकाळी पावसाचे पाणी साचल्याने त्याठिकाणच्या उघड्यावरील विद्युत वायरीचा स्पार्क होवून वायर जळाली. यामुळे परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. परंतु पाऊस सुरुच असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळा होत होता. अखेर सुमारे पाच तासानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसराचा वीज पुरवठा पूर्ववत झाला.
मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यात महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना अशा प्रकारच्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा संताप रहिवासी जयश्री सावंत यांनी व्यक्त केला आहे. पदपथांवरील उघड्या डीपी, तसेच उघड्यावर पडलेल्या वायरींमध्ये पाणी गेल्याने दुर्घटना घडत आहेत.
परंतु पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना घडूच नयेत याकरिता डीपी, तसेच उघड्यावरील वायरी यामध्ये दुरुस्ती करण्याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होवून रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचाही संताप रहिवासी व्यक्त करत आहेत.