उमरोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; नागरिकांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:29 AM2020-05-25T00:29:23+5:302020-05-25T00:29:37+5:30
१ कोटी ४५ लाखांचा खर्च
- मयूर तांबडे
नवीन पनवेल : दरवर्षी उमरोली येथील नागरिकांना पावसाळ्यात छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असे. आता नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे.
पनवेल शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर उमरोली गाव वसलेले आहे. उमरोली येथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने अतिवृष्टी झाल्यास गावात जाण्याचा मार्ग दोन-तीन दिवस बंद राहतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी होती.
पावसाळ्यात गाढी नदीला पूर येत असल्याने पुलावरून (फरशी) पाणी जाते. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक वर्ग चिंतेत असतो. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमरोली येथील पुलासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. २०१९ मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सद्य:स्थितीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
९ जुलै २०१९ मध्ये छोट्या पुलावरून दुचाकी घेऊन जाताना दोघांचा मृत्यू झाला होता. आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य उमरोली येथील पुलावरून दुचाकीसह वाहून गेले होते. आदित्य आंब्रे यांचा मृतदेह ११ जुलै रोजी सापडून आला होता. तर सारिका आंब्रे हिचा मृतदेह १७ जुलै रोजी बेलापूर खाडीत सापडला. त्यांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण आठ लाखांची मदत करण्यात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी मुलाला वाचवताना पाण्यात उडी मारलेल्या खाजीदा मोहम्मद शेख (४५) या महिलेला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले होते. उमरोली येथील छोटा पूल पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांसाठी जीवघेणा ठरत होता. आता नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
पावसाळ्यातील जीवघेण्या प्रवासातून सुटका
च्उमरोली पुलाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे रखडलेला होता. त्यामुळे नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागे. दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या पुलामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे.
च्उमरोली पुलाबाबत ‘लोकमत’द्वारे वारंवार वृत्त प्रसिद्ध करून सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला होता. पूल लहान असल्याने वर्दळीस अडचणीचा ठरत होता. पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीस धोकादायक ठरत होता. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने यंदा नागरिकांची जीवघेणा प्रवासातून सुटका होण्याची शक्यता आहे.